अभिनेत्री श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) अलीकडेच ऑस्ट्रेलियातील आपल्या दहा दिवसांच्या सहलीवरून परतली आहे. मात्र अद्याप ती तिथल्या आठवणींमध्ये रमली आहे. ऑस्ट्रेलियातील विविध शहरांमध्ये घालवलेल्या सुट्टीतील आपल्या काही आवडत्या क्षणांच्या आठवणी श्रियाने आपल्या चाहत्यांना सांगितल्या आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये जाण्याची श्रिया पिळगावकरची दुसरी वेळ आहे. यापूर्वी ती शाळकरी वयात आजोबांसोबत तिथे गेली होती. याबद्दल तिने सांगितले की, मी मागच्या वेळेला ऑस्ट्रेलियाला गेले होते, तेव्हा मी शाळेत शिकत होते. मी माझ्या आजोबांसोबत तो प्रवास केला आणि तिथे माझा वेळ अगदी मस्त गेल्याचं मला आठवतं. आपण ऑस्ट्रेलियाला पुन्हा जायला हवं ही माझी इच्छा होती. पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला भेट द्यायला मी खूपच उत्सुक होते, विशिषत: सप्टेंबर महिन्यात कारण या काळात तिथलं हवामान सहलीसाठी अगदी साजेसं असते.
श्रियाने पुढे म्हटले की, ऑस्ट्रेलियामध्ये कितीतरी विविध प्रकारचे अनुभव घेण्यासारखे आहे. मला वाटतं प्रवासाचा छंद असलेल्या कोणत्याही व्यक्तीने ऑस्ट्रेलियातील खाद्यसंस्कृती आणि वन्यजीवन अनुभवलंच पाहिजे. ऑस्ट्रेलिया हे आपल्या विपुल धनधान्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि माझ्या या शहरीमध्ये माझं प्रत्येक जेवण अविस्मरणीय आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया आपल्या वन्यजीवनाचे कशाप्रकारे संरक्षण करते हे, विशेषत: वणव्यांमुळे तिथल्या निसर्ग आणि वन्यसंपदेवर झालेल्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर पाहताना खूप छान वाटले. यासाठी मी Tourism Australiaचे खूप आभारी आहे.