साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री श्रुती हासन (Shruti Haasan ) सिनेमांपेक्षा अनेकदा पर्सनल लाईफमुळेच चर्चेत असते. सध्या काय तर श्रुतीचे तिच्या आई-बाबांच्या घटस्फोटाबद्दलचे वक्तव्य चर्चेत आहे. आई-बाबाचा घटस्फोट झाला तेव्हा मला आनंद झाला होता, असे तिने म्हटलेय. (Kamal Haasan and Sarika)
होय, आई-बाबांचा घटस्फोट खरं तर हा कुठल्याही मुलासाठी वेदनादायी ठरतो. पण श्रुती याला अपवाद म्हणता येईल. अर्थात यामागे तिचे स्वत:चे विचार होते. श्रुतीची आई म्हणजे अभिनेत्री सारिका (Sarika) आणि वडील अभिनेते कमल हासन (Kamal Haasan ) यांनी 16 वर्षे एकत्र संसार केला आणि यानंतर अचानक घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. आई-बाबाचा घटस्फोट झाला तेव्हा श्रुती 16 वर्षांची होती. तर तिची बहीण अक्षरा तिच्यापेक्षा बरीच लहान होती. आई-बाबांच्या घटस्फोटाबद्दल झूम डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत श्रुती बोलली.
काय म्हणाली श्रुती‘माझ्या आई बाबांनी त्यांच्या लग्नाच्या 16 वर्षांनंतर घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने मी एक्साइटेड होते. आता ते त्यांचे स्वतंत्र आयुष्य जगू शकतील, याचा मला आनंद झाला होता. त्यांनी अनेक वर्षे एकत्र संसार केला. पण त्यापुढे त्यांना एकत्र राहणे शक्य नव्हते आणि माझ्या मते दोन व्यक्ती एकत्र आनंदात राहू शकत नसतील तर ओढून-ताणून एकत्र राहण्यापेक्षा त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेणे योग्य होते. क़ेवळ आम्हा मुलींसाठी आईबाबांनी बळजबरीने एकत्र राहणे योग्य नव्हते. त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला तेव्हा मी तरूण होते. त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि झालेत़ यापेक्षा चांगले काहीही होऊ शकले नसते, असे श्रुती म्हणाली.
मी बाबांच्या खूप क्लोज आहे आणि आईचीही माझ्या आयुष्यात खास जागा आहे. त्यांचा तो निर्णय त्यांचा होता आणि तो योग्य होता,’ असेही श्रुती म्हणाली. कमल हासन व सारिका यांनी 1988 साली लग्न केले होते आणि 2004 साली दोघांनीही घटस्फोट घेतला होता.