झगमगत्या दुनियेत करियर करण्याचं स्वप्न घेऊन अनेकजण येतात. त्यापैकी सगळ्यांनाच इथं झटपट यश मिळतं असंही नाही.कारण कोणतंही क्षेत्र असो त्यात स्ट्रगल कुणालाही चुकला नाही. मात्र अशा आव्हानात्मक परिस्थितीतही मेहनतीच्या जोरावर अनेक कलाकार सुपरस्टारपदावर पोहचले आहेत. रसिकांच्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत. करिअरच्या ऐन भरात असताना या कलाकारांना रसिकांचं प्रेम, अमाप लोकप्रियता आणि बक्कळ पैसाही मिळतो. मात्र याच चित्रपटसृष्टीची जशी चांगली बाजू तशी दुसरी बाजूही आहे.
सिनेसृष्टीत वेगवेगळ्या गोष्टींमुळे अभिनेते आणि अभिनेत्रींबरोबर भेदभाव केल्याची अनेक उदाहरणे आपण ऐकतो. तमिळ, तेलगू, आणि हिंदी सिनेमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी श्रृति हासन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नेहमी परखत मंत मांडणी-या श्रृतिने आता थेट सिनेसृष्टीत अभिनेत्रींना मिळणारी दुय्यम वागणूकीवरच निशाणा साधला आहे. अभिनेत्रींना नेहमीच अभिनेत्यांपेक्षा दुय्यमच वागणूक दिली गेली आहे. आजही हे चित्र फार बदललेले दिसत नाही. सुरूवातीच्या काळात मलाही बसायला साधी खुर्ची देखील दिली जायची नाही. मात्र त्याचवेळी अभिनेत्यांना मात्र सगळ्या सुविधा देण्यात यायच्या.
सुपरस्टारची मुलगी असल्यामुळे माझ्या वाट्याला फारसे कोणी गेले नाही. त्यामुळे समाधानकारक अनुभव आल्याचेही तिने म्हटले आहे. कमल हासनमुळे करिअरला नक्कीच फायदा झाल्याचेही तिने मान्य केले आहे. कोणतीही सिनेसृष्टी असो प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीत समानता ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. ब-याचजणी वेगवेगळ्या गोष्टींवर आवाजही उठवत आहेत. याबाबत सवाल जवाब होत आहेत ही गोष्ट अधिक समाधानकारक असल्याचे तिने सांगितले.