महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हिचा अॅक्टिंग डेब्यू तर झाला. त्याचे कौतुकही झाले. पण पुढे असे काही होईल, याची कुणीही कल्पना केली नव्हती. होय, श्वेताचा अॅक्टिंग डेब्यू लोकांसमोर येताच तो वांद्यात सापडला. कल्याण ज्वेलर्ससाठी अमिताभ व श्वेता यांनी सुमारे दीड मिनिटांची जाहिरात केली होती. ही जाहिरात अनेकार्थाने खास होती. कारण या निमित्ताने श्वेता पहिल्यांदा कॅमेरा फेस करत होती. शिवाय यात ती वडिलांसोबत दिसली होती. जाहिरात प्रसारित झाली आणि श्वेताचा यातील अभिनय पाहून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. पण बँक कर्मचारी आणि बँकिंग व्यवस्थेच्या भावना दुखावल्याप्रकरणी आॅल इंडिया बँकिंग आॅफिसर्सकडून कल्याण ज्वेलर्सला नोटीस बजावण्यात आली. ही जाहिरात अत्यंत हिन दर्जाची असून यात बँक कर्मचाऱ्यांची आणि व्यवस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे लाखो बँक कर्मचा-यांच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत, असा आरोप आॅल इंडिया बँकिंग आॅफिसर कॉन्फिडरेशनच्या सरचिटणीस सौम्या दत्त यांनी केला. शेवटी काय, या आरोपामुळे कल्याण ज्वेलर्सने ही जाहिरात मागे घेतल्याचे जाहीर केले.अनवधानाने आमच्याकडून भावना दुखावल्या गेल्याप्रकरणी आम्ही माफी मागतो आणि सर्व माध्यमांतून आम्ही ती जाहिरात हटवली आहे, असे स्पष्टीकरण कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक रमेश कल्याणरमन यांनी दिले आणि या स्पष्टीकरणासोबत श्वेताच्या पहिल्यावहिल्या अॅक्टिंग डेब्यूला ग्रहण लागले. आॅल इंडिया बँकिंग आॅफिसर्सच्या आरोपात तथ्य आहेच, यात दुमत नाही. पण श्वेता यामुळे हिरमुसली असणार, हे नक्कीच.
महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. श्वेता फिल्मी दुनियेत नाही. पण म्हणून फिल्मी दुनियेशी तिचे नातेचं नाहीच, असे मात्र मुळीच नाही. ग्लॅमर दुनियेपासून दूर असली तरी श्वेता कायम चर्चेत असते. ४४ वर्र्षांची श्वेता ही अमिताभ व जया यांची मोठी मुलगी आहे. १९९७ मध्ये तिने निखील नंदासोबत लग्न केले. तिला नव्या नवेली नंदा आणि अगस्त्या नंदा अशी दोन मुले आहेत. लवकरच श्वेताने लिहिलेले पहिले पुस्तक ‘पॅराडाईज टॉवर्स’ प्रकाशित होतेय. खुद्द श्वेताने याबद्दल घोषणा केली होती. एक दिवस सकाळी उठले अन् माझ्या मनात हे पुस्तक लिहिण्याचा विचार आला. हे माझ्यासाठी अगदी स्वाभाविक आहे. माझे आजोबा साहित्यिक होते. मला साहित्यिकांचा वारसा लाभला आहे. लहानपणापासून लिहिण्या-वाचण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करण्यात आले आहे, असे श्वेताने सांगितले होते.