Sid-Kiara Wedding Video : 'शेरशाह' कपल सिड-कियारा खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकले. ७ फेब्रुवारी रोजी जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. दोघांचे सुंदर फोटोही प्रसिद्ध झाले आणि काही सेकंदातच सोशल मीडियावर व्हायरल झाले. 14 मिलियन लाईक्सही फोटोंना मिळाले. आता सिड-कियाराच्या लग्नाचा व्हिडिओ दोघांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. अगदी स्वप्नवत असावं अशा थाटामाटात लग्नसोहळा पार पडला आहे.
व्हिडिओची सुरुवात नववधू कियाराच्या एंट्रीने होते. गुलाबी लेहेंग्यात कियारा येते आणि समोर मंडपात सिद्धार्थ तिची वाट बघत उभा असतो. दार उघडतं आणि कियारा बाहेर येते. या खास दिवसाचा आनंद दोघांच्या चेहऱ्यावर दिसतो. कियारा डान्स करतच सिद्धार्थच्या दिशेने येते आणि सिद्धार्थ गंमतीने घड्याळ्याकडे बघतो किती उशीर झाला असं दाखवतो. यानंतर ती दुरुनच छान दिसतोय असा इशारा करते आणि त्याच्याजवळ येते. दोघेही मिठी मारतात. एकमेकांना हार घालताच त्यांच्यावर फुलांचा वर्षांव होतो. दरम्यान दोघेही एकमेकांना kiss करतात. यानंतर दोघेही एकमेकांकडे बघून हसत हसतच हात जोडताना दिसतात.
'रांझा' गाण्यावर सिड-कियाराचा वेडिंग व्हिडिओ
'शेरशाह' सिनेमाच्या शूटिंगवेळी सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांच्या प्रेमात पडले. या सिनेमातील 'रांझा' हे गाणं फार लोकप्रिय आहे. खास सिड-कियाराच्या लग्नासाठी गाण्याचे नवीन बोल तयार करण्यात आले आणि या नवीन व्हर्जनवर हा वेडिंग व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. कियाराचा भाऊ मिशाल अडवाणी याने हे गाणे लाडक्या बहिणीसाठी बनवलं असल्याची चर्चा आहे. सिड-कियाराच्या या रोमॅंटिक व्हिडिओला अर्ध्या तासातच १० लाख लाईक्स मिळाले आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या व्हिडिओवर कमेंट करत 'न्यूली वेड' कपलला शुभेच्छा दिल्या आहेत.
लग्नानंतर कियारा दिल्लीतील तिच्या सासरी पोहोचली. सासरी तिचे अगदी थाटात स्वागत करण्यात आले. दोघांनी कालच दिल्लीत नातेवाईक आणि जवळच्या मित्रपरिवारासाठी रिसेप्शन दिले. तर लवकरच दोघेही मुंबईतही रिसेप्शन देणार आहेत. यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांना आमंत्रण देण्यात आले आहे.