Join us

Sidhu Moose Wala murder case: सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात पहिली अटक; उत्तराखंडमधून मनप्रीत सिंगला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 8:32 PM

रविवारी सिद्धू मूसेवालाची मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.

Sidhu Moose Wala murder case: गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात पोलिस तपासादरम्यान पहिली अटक करण्यात आली. मनप्रीत सिंग नावाच्या एका तरूणाला पोलिसांनी अटक केली. मूसेवाला हत्येनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. केवळ पंजाबच नव्हे तर संपूर्ण देश या घटनेने हादरला आहे. पंजाबातील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा कॅनडास्थित साथीदार गोल्डी ब्रार याने सिद्धू मूसेवाला हत्येची जबाबदारी स्वीकारली. या प्रकरणाचा तपास करत असताना पंजाब पोलिसांनी उत्तराखंडमध्ये मनप्रीत सिंगची चौकशी केली आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी मनप्रीतला न्यायालयात हजर केले होते आणि त्यानंतर त्याला ५ दिवसांची पोलीस रिमांड देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने ANI ने दिली आहे.

रविवारी (२९ मे) सिद्धू मूसेवालावर भररस्त्यात अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. मारेकऱ्यांनी गोळीबार केला त्यावेळी मूसेवालासोबत आणखी दोन मित्रदेखील कारमध्ये होते. गोळीबारात ते दोघेही जखमी झाले. सिद्धू मूसेवालाला रूग्णालयात नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं. पण त्याचे दोन मित्र सुदैवाने बचावले. अंदाधुंद गोळीबार होत असताना सिद्धू घाबरला नाही, उलट अखेरच्या क्षणापर्यंत तो लढा देत राहिला, असा अंगावर काटा आणणार प्रसंग त्या मित्रांनी सांगितला.

रविवारी सिद्ध मुसेवाला कारने मानसाच्या जवाहरकेमध्ये पोहोचला. तिथेच हा हल्ला झाला. त्याचा एक मित्र कारमध्ये मागे बसला होता.  पण गाडीत जास्त लोक बसू शकत नसल्याने सुरक्षारक्षक त्याच्यासोबत नव्हते. गावापासून काही दूर अंतरावर कारवर मागून गोळीबार झाला. एक गाडी अचानक समोर येऊनही उभी राहिली. त्या कारमधून तरूण उतरला आणि त्याने गोळीबार सुरू केला. सिद्धूने आपल्या बंदुकीतून दोन गोळ्या चालवल्या. पण मारेकऱ्यांकडे ऑटोमॅटिक गन होती. त्यामुळे सिद्धूचा संघर्ष अपुरा पडला. कारला जायला जागा मिळाली असती तर कदाचित सिद्धू वाचू शकला अशी माहिती त्याच्या एका मित्राने दिली.

टॅग्स :सिद्धू मूसेवालापंजाबबॉलिवूडपोलिस