ऐंशीच्या दशकात साऊथच्या प्रत्येक सिनेमात एक चेहरा हमखास दिसायचा, तो म्हणजे सिल्क स्मिताचा. पण हे चित्रपट आणि यातील भूमिकांमुळे सिल्क स्मिताला सॉफ्ट पॉर्न अॅक्ट्रेस, सेक्स सायरन, बिकनी गर्ल अशी ना जादू अशी नावे मिळालीत. 1996 मध्ये आजच्या दिवशी म्हणजे, 23 सप्टेंबरला सिल्क स्मिता नावाचे वादळ कायमचे शांत झाले होते. तिचा मृतदेह तिच्या राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तिने आत्महत्या केली, असे काही लोक मानतात. तर काहींच्या मते, तिच्या मृत्यूमागे वेगळेच रहस्य आहे. आज इतक्या वर्षांनंतरही सिल्म स्मिताचा मृत्यूचे गूढ कायम आहे.
सिल्कचे खरे नाव विजयालक्ष्मी होते.सिल्क इयत्ता चौथीपर्यंत शिकली आणि घरच्या हलाखीमुळे चौथीनंतर शाळा सोडली. घरच्यांनी अगदीच कमी वयात तिचे लग्न लावून दिले. लग्नानंतर सिल्कला सासरचा छळ सहन करावा लागला. या छळाला कंटाळून सिल्क एक दिवस घरून पळाली आणि पुढे तिने फिल्म इंडस्ट्रीत येण्याचा निर्णय घेतला.
बालपणापासूनच सिल्कला सिने इंडस्ट्रीची ओढ होती. सासरहून पळून आलेल्या सिल्कने कसाबसा या इंडस्ट्रीत प्रवेश् मिळवला. सुरुवातीला सिल्कने सिनेमांमध्ये मेकअप असिस्टंट म्हणून कामास सुरुवात केली. शूटिंगदरम्यान सिल्क अभिनेत्रींच्या चेह-यावर टचअपचे काम करत होती. सिनेमांमधील झगमगाट पाहून स्मिताही अभिनेत्री होण्याचे स्वप्न बघू लागली होती.
1978 मध्ये ‘बेदी’ या कानडी सिनेमात तिला पहिला ब्रेक मिळाला. पुढच्याच वर्षी ‘वांडीचक्रम’ या सिनेमात तिला मोठी संधी मिळाली. या सिनेमात तिने स्मिताचे पात्र साकारले होते. तिची ही भूमिका प्रचंड गाजली. या भूमिकेने तिला ‘सिल्क स्मिता’ हे नाव मिळाले.
सिल्कचा चित्रपट म्हटले की, लोकांच्या उड्या पडत. तिच्या चाहत्यांची संख्या इतकी वाढली होती, की प्रत्येक दिग्दर्शकाला स्मिता आपल्या सिनेमात असावी असे वाटू लागले. रजनीकांत ते कमल हासन अशा बड्या स्टार्सलाही आपल्या चित्रपटात सिल्कचे एखादे गाणे हवे असायचे. बॉलिवूडमध्ये सुध्दा सिल्कची जादू चालली. ‘जीत हमारी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ताकतवाला , पाताल भैरवी, तूफान रानी, कनवरलाल, इज्जत आबरू,द्रोही, विजय पथ अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत तिने काम केले.
खरे तर सिल्कचे स्टारडम एका वेगळ्याच उंचीवर पोहोचले होते. पण असे असूनही तिच्या आयुष्याची कटू सत्य काही वेगळचे होते. मादक अभिनेत्री ही ओळख अखेरपर्यंत तिला पुसता आली नाही. तिच्या वाट्याला बहुतांश बी आणि सी ग्रेड चित्रपट आलेत. फिल्म इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी सिल्कने मिळेल त्या उत्तेजक भूमिका केल्या. या भूमिकांनी तिला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हणूनही ओळखले जाऊ लागले. तेव्हाच्या वृत्तपत्रांनीही तिच्याबद्दल वाईटच लिहिले. रस्त्यावरून जाणारे लोकही तिला पाहिले की, अश्लिल चाळे करायचे. अखेर 23 सप्टेंबर 1996 रोजी सिल्कने आत्महत्या केली. त्यावेळी ती केवळ 35 वर्षांची होती.
असे म्हणतात की, प्रेमात झालेला दगा, एकटेपण आणि दारूचे व्यसन यामुळे सिल्क डिप्रेशनमध्ये गेली होती आणि याचमुळे तिने स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला. काही लोकांच्या मते, एका मित्राने तिला निर्मिती क्षेत्रात पैसा लावण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार सिल्कने कोट्यवधी रूपये ओतले. मात्र पहिल्या दोन सिनेमांमध्ये तिला दोन कोटींचा तोटा झाला. तिचा तिसरा सिनेमा निर्माती म्हणून पूर्णच होऊ शकला नाही. या तोट्याने स्मिताच्या खासगी आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला. ती मानसिकरित्या खचून गेली होती.