Join us

गायिका अलका याग्निक यांना झालाय दुर्मिळ आजार, पोस्ट करुन केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 1:12 PM

अलका याग्निक यांना गंभीर आजार झाला असून त्यांनी तरुणांसाठी खास संदेश दिला आहे (alka yagnik)

'अगर तुम साथ हो', 'चोली के पिछे क्या है', 'टिप टिप बरसा पानी', 'परदेसी परदेसी' अशा ९० च्या दशकातील अनेक लोकप्रिय गाण्यांच्या गायिका अलका याग्निक. अलका याग्निक यांनी सोशल मीडियावर त्यांना झालेल्या गंभीर आजाराचा खुलासा केलाय. त्यामुळे सर्वांना धक्का बसलाय. इतकंच नव्हे तर सोनू निगम आणि इतर अनेक गायकांनी याविषयी काळजी व्यक्त केलीय. अलका यांना बहिरेपणाची समस्या निर्माण झाली असून त्यांनी याविषयी सविस्तर सांगितलंय. 

अलका याग्निक यांनी केला खुलासा

अलका यांनी सोशल मीडियावर याविषयी पोस्ट केलीय.  यात त्या लिहितात, 'माझे सर्व चाहते, मित्र, आणि शुभचिंतकांसाठी मला काहीतरी सांगाायचं आहे. काही आठवड्यांपूर्वी, मी फ्लाइटमधून बाहेर पडले तेव्हा मला अचानक जाणवलं की मला काहीही ऐकू येत नाही. गेल्या काही आठवड्यांत याविषयीच्या काही घटना मी अनुभवल्या. माझ्या सर्व मित्र-मैत्रीणी आणि चाहते माझ्याबद्दल विचारपूस करत आहेत. त्यामुळे धीर गोळा करुन मला सांगणं भाग आहे.  व्हायरल अटॅकमुळे माझ्या दुर्मिळ सेन्सरी न्यूरल नर्व्ह अर्थात श्रवणशक्तीवर परिणाम झालाय. डॉक्टरांनी हे निदान केलंय.'

अलका याग्निक पुढे लिहितात, 'या अचानक मोठ्या आघाताने मला काय करावं हे कळत नाहीय. मी या समस्येला आता स्वतःशी जोडून घेण्याचा प्रयत्न करतेय. कृपया मला सदिच्छा द्या. माझ्या चाहत्यांसाठी आणि सर्व तरुण मित्रांसाठी मी एवढंच सांगेन की, खूप मोठ्या आवाजातील संगीत आणि हेडफोन्सपासून सावध राहा. मी लवकरच तुम्हाला व्यावसायिक जीवनाबद्दल अपडेट देईल. तुमच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने मी माझे आयुष्य पुन्हा व्यवस्थित करेन आणि लवकरच तुमच्या संगीतसेवेसाठी परत येईन अशी आशा आहे. तुमचा पाठिंबा आणि समजूतदारपणा या कठीण काळात माझ्यासाठी महत्वाचा आहे.' अलका यांच्या पोस्टवर सोनू निगम, इला अरुण यांनी काळजी व्यक्त केलीय.

 

टॅग्स :अलका याज्ञिकबॉलिवूड