कर्नाटकात तीन दिवसीय हम्पी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी २९ जानेवारीपर्यंत हा महोत्सव सुरु होता. या महोत्सवात अनेक नामवंत गायकांनी आपल्या गायनाने सादरीकरण केले. प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनीही या महोत्सवात उपस्थिती दर्शवत गाणं गायले. मात्र कैलाश खेर स्टेजवर परफॉर्मन्स करत असताना दोन मुलांनी स्टेजवर बाटल्या फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
कैलाश खेर स्टेजवर परफॉर्मन्स करत असताना दोन तरुणांनी त्यांना कन्नड गाणे गाण्यास सांगितले. मात्र त्यांनी ते न गायल्याने दोन तरुणांनी त्यांच्यावर पाण्याच्या बाटल्या फेकल्या. रविवारी संध्याकाळी हा धक्कादायक प्रकार घडला. गायकावर बाटली फेकल्याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. तसेच कैलाश खेर सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तीन दिवसीय हम्पी महोत्सव २७ जानेवारीपासून सुरू झाला आणि २९ जानेवारीपर्यंत चालला. शुक्रवारी सायंकाळी प्रमुख बसवराज बोम्मई यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड आणि कन्नड गायकांनी परफॉर्म केले. त्यात जागतिक वारसा असलेल्या स्थळाचे वैभव दाखविण्यासाठी साऊंड अँड लाईट शोचेही आयोजन करण्यात आले होते. कन्नड पार्श्वगायक अर्जुन, विजय प्रकाश, रघु दीक्षित आणि अनन्या भट यांनी कार्यक्रमात सादरीकरण केले.
कैलाश खेर हे एक उत्तम गायक-
कैलाश खेरबद्दल बोलायचे झाले तर ते बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान गायकांपैकी एक आहेत. कैलाश खेर यांनी अनेक अप्रतिम गाणी गायली आहेत. 'अल्लाह के बंदे हंस दे...' या गाण्याने धुमाकूळ घातली होती.