Kailash Kher : संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही आणि यश मिळालं की ते टिकवणं प्रत्येकालाच शक्य असतं असं नाही. बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कैलाश खेर देखील आयुष्यात मोठ्या संघर्षाला सामोरे गेले आहेत. संघर्षाच्या काळात गंगा नदीत उडी मारुन आयुष्य संपवणार होतो असा धक्कादायक खुलासा कैलाश खेर यांनी केला आहे.एएनयाय दिलेल्या मुलाखतीत कैलाश खेर यांनी आयुष्यातील काही कठीण क्षणांना उजाळा दिला. ते म्हणाले, 'मी जगण्यासाठी अनेक विचित्र कामे केली आहेत. २०-२१ वर्षाचा असताना दिल्लीमध्ये निर्यातीचा व्यवसाय सुरु केला होता. जर्मनीला हॅंडीक्राफ्ट विकण्याचा तो व्यवसाय होता. मात्र दुर्दैवाने तो व्यवसाय बंद झाला. व्यवसायात अनेक संकटं आली. त्यानंतर मी पंडित बनण्यासाठी ऋषिकेश ला गेलो. मात्र तिथे सगळेच माझ्याहून लहान होते. मी निराश झालो होतो. कारण मी सगळ्यात अयशस्वी होत होतो. म्हणूनच एक दिवस मी गंगा नदीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र घाटावर असणाऱ्या एका माणसाने नदीत उडी मारली आणि मला वाचवले.'
ते पुढे म्हणाले, 'तो माणूस मला म्हणाला पोहता येत नसेल तर का उडी मारली. मी म्हणलं मरण्यासाठी. हे ऐकून त्याने मला टपली मारली. या घटनेनंतर मी स्वत:ला खोलीत बंद केले. मी माझ्या अस्तित्वाबाबत विचार करायचो. देवाशी संवाद साधायचो. मला विश्वास आहे की मॉं गंगानेच मला समुद्राकडे ढकलले. मी समुद्र किनारी म्हणजेच मुंबईला आलो. मी काहीच कामाचा नाही असा विचार करणं जेव्हा बंद केलं तेव्हा मी नैराश्यातून बाहेर आलो. '
कैलाश खेर यांनी 'अल्ला के बंदे', 'सैय्या', 'तेरी दिवानी' असे अनेक हिट गाणी दिली आहेत. ही गाणी आजही रसिकांच्या ओठांवर असतात. नैराश्यावर मात करत कैलाश खेर यांनी संगीत क्षेत्रात नाव कमावलं हीच त्यांची आयुष्यभराची पुंजी आहे. कैलाश खेर यांना 2017 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे.