KK Krishnakumar Kunnath Death: म्युझिक इंडस्ट्रीवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट गाण्यांना आपला आवाज देणारा शानदार-जानदार सिंगर कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath )अर्थात केके (KK )आज आपल्यात नाही. वयाच्या 53 व्या वर्षी त्याचं अकाली निधन झालं. त्याच्या निधनानं सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. केकेच्या डोक्यावर आणि ओठावर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. त्यामुळे अनैसर्गिक मृत्यूचा संशय व्यक्त केला जात आहे. अद्याप पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलेला नाही, त्यातूनच केकेच्या मृत्यूचं खरं कारण समोर येईल.
केकेने बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली. तरूणाई त्याच्या गाण्यांवर फिदा होती. जगभरातील अनेक कॉन्सर्ट व इव्हेंटमध्ये केके परफॉर्म करायचा. पण बॉलिवूडच्या अन्य सिंगर्ससारखं लग्नात गायला त्याला आवडायचं नाही. अगदी कोट्यवधी रूपये दिले तरी लग्नात गाणार नाही, या भूमिकेवर शेवटपर्यंत तो ठाम होता, ठाम राहिला.
एका मुलाखतीत केकेला याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. सिंगर म्हणून तू कधी एखादी ऑफर नाकारली आहेस का? असा तो प्रश्न होता. यावर ‘हो, मी वेडिंग फंक्शनमध्ये गाण्याच्या अनेक ऑफर्स नाकारल्या आहेत. मला कुणी 1 कोटी दिलेत तरी मी लग्नात गाणार नाही... मी अशा ऑफर्स थेट धुडकावून लावतो,’ असं केके म्हणाला होता.
अनेक गायकांनी सिंगींगसोबत अॅक्टिंगमध्येही नशीब आजमावलं. याबद्दल विचारलं असता, ‘ओह प्लीज, जे सुरू आहे, ते तसंच सुरू राहू द्या. मी पी-नट्ससाठी अॅक्टिंग करू शकत नाही. काही वर्षांपूर्वी मला एक चित्रपट ऑफर झाला होता. पण मी नकार दिला. मी सिंगर आहे आणि सिंगरच बनून राहणार,’ असं तो म्हणाला होता.
कृष्णकुमार कुन्नथ उर्फ केकेच्या बोलण्यावरून स्पष्ट होतं की, संगीत हेच केकेचं पहिलं आणि शेवटचं प्रेम होतं. ‘छोड आए हम...’ या ‘माचिस’च्या गाण्यापासून केकेने डेब्यू केला होता. पण त्याला खरी ओळख दिली ती ‘हम दिल दे चुके सनम’च्या ‘तडप तडप के इस दिल ने’ या गाण्यानं. यानंतर केकेनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्याच्या आवाजातील हे गाणं ऐकून आजही डोळ्यांच्या कडा ओलावतात.