बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद अजीज यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले आहे. ते ६४ वर्षांचे होते. मोहम्मद अजीज यांची मुलगी सनाने त्यांच्या निधनाची माहिती एका वाहिनीला दिली आहे. मोहम्मद अजीज सोमवारी रात्री कोलकातामध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते आणि मंगळवारी ते मुंबईत पोहचले त्यानंतर साधारण दुपारी तीननंतर त्यांची तब्येत बिघडली. मिळालेल्या माहितीच्या आधारे घरी परतताना विमानतळावर मोहम्मद अजीज यांना छातीत दुखू लागले. म्हणून ड्रायव्हरने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल केले आणि त्यांची मुलगी सना हिला कळवले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अजीज यांचा जन्म १९५४ साली पश्चिन बंगालमध्ये झाला होता. अजीज यांनी बॉलिवूड व्यतिरिक्त बंगाली, उडिया आणि इतर भाषेतील सिनेमांसाठी पार्श्वगायन केले होते. अजीज मोहम्मद रफींचे खूप मोठे चाहते होते. त्यांना अनु मलिक यांनी बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक दिला होता. अमिताभ बच्चन यांचा चित्रपट मर्दमधील शीर्षक गीत मैं हूं मर्द टांगे वालामधून ते पार्श्वसंगीतात लोकप्रिय झाले होते. त्यानंतर अजीज यांनी बऱ्याच सिनेमातील लोकप्रिय गाणी गायली होती. लाल दुपट्टा मलमल का, मैं से मीना से न साकी से यांसारखी शेकडो गाणी त्यांनी गायली होती. त्यांनी मर्द शिवाय बंजारन, आदमी खिलौना है, लव ८६, पापी देवता, जुल्म को जला दूंगा, पत्थर के इन्सान, बीवी हो तो ऐसी, बरसात की रात यांसारख्या चित्रपटातील गाणी गायली होती.