नव्वदच्या दशकातील बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक नितीन बाली यांचे रोड अपघातात निधन झाले. ते 47 वर्षांचे होते. या अपघाती मृत्यूची नोंद बोरीवली कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
नितीन बाली मंगळवारी सकाळी बोरीवलीहून मालाड येथे त्यांच्या घरी जात असताना त्यांची कार डिवाइडरला आदळली आणि अपघात झाला. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर काही वेळात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र घरी गेल्यानंतर त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या आणि त्यांचे निधन झाले. नितीन बाली नव्वदच्या दशकातील लोकप्रिय गायक होते. त्यांनी बरीच क्लासिकल गाणी रिमेक केली होती. त्यातील नीले-नीले अंबर हे गाणे खूप गाजले होते. नितीन यांनी 1998 साली ना जाने या अल्बममधून संगीत क्षेत्रात पदार्पण केले होते. या अल्बममध्ये दहा गाण्यांचा समावेश होता आणि ही सगळी गाणी रसिकांना भावली होती. शेवटचे त्यांनी 2012 साली लाइफ की तो लग गी या सिनेमातील एका गाण्याला स्वरसाज दिला होता.