Join us

परदेशातून आल्यावर क्वारंटाईन व्हायचे नसेल तर हॉटेलवाले मागतायेत 10 हजार? गायिकेने केला आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 4:11 PM

हॉटेलला 10 हजार रुपये दिल्यास क्वारंटाईनमधून सुटका होतेय असा आरोप एका गायिकेने सोशल मीडियाद्वारे केला आहे.

ठळक मुद्देपियू उदासी या गायिकेने 28 मार्चला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात तिने म्हटले होते की, माझा भाऊ आफ्रिकेवरून नुकताच भारतात परत आला असता त्याला विमानतळावर थांबवण्यात आलं.

कोरोनाचा प्रार्दुभाव भारतात सगळीकडेच वाढला आहे. महाराष्ट्रात तर कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत आणि त्यामुळे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. परदेशातून कोणीही नागरिक भारतात आल्यास त्याला काही दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे. पण हॉटेलला 10 हजार रुपये दिल्यास या क्वारंटाईनमधून सुटका होतेय असा आरोप एका गायिकेने सोशल मीडियाद्वारे केला आहे. 

पियू उदासी या गायिकेने 28 मार्चला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात तिने म्हटले होते की, माझा भाऊ आफ्रिकेवरून नुकताच भारतात परत आला असता त्याला विमानतळावर थांबवण्यात आलं. येथील नियमांनुसार क्वारंटाइन होणे बंधनकारक असल्याचे त्याला सांगण्यात आले. पण त्याने तेथील अधिकाऱ्यांना सांगितले की, त्याची दोन वेळा कोरोना चाचणी झाली असून रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आफ्रिकेवरुन येताना त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर दुबईत सुद्धा टेस्ट केली आणि दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले. मात्र, असे असतानाही सात दिवस त्याला क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आले. या सात दिवसांत तुमची टेस्ट होणार नाही. केवळ तुम्हाला हॉटेलचं रूम भाडे, खाण्या-पिण्याचं आणि औषधांचं बिल भरावं लागेल असं देखील सांगण्यात आले. त्यामुळे या गोष्टीला माझ्या भावाने विरोध केला. त्यानंतर माझ्या भावाला एका पोलीस कर्मचाऱ्याने बाजूला नेलं आणि सांगितलं की, आम्ही येथून तुम्हाला हॉटेलमध्ये घेऊन जाणार आहोत. तुम्हाला तेथे क्वारंटाईन व्हायचं नसेल तर काय करायचं हे तिथे गेल्यावर हॉटलचे मॅनेजेंट तुम्हाला सांगेल... हॉटेलमध्ये गेल्यावर माझ्या भावाचे पासपोर्ट घेण्यात आले आणि माझ्या भावाला सांगण्यात आले की, दहा हजार रुपये भरल्यास तुम्हाला क्वारंटाईन व्हायची गरज नाहीये. पण माझ्या भावाने या गोष्टीसाठी नकार दिल्यावर त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला. 

या व्हिडिओनंतर 1 एप्रिलला पियूने आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि त्यात म्हटले आहे की, माझ्या भावासोबत जसे घडले तसे अनेकांच्या बाबतीत घडले असे मला अनेकजण कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. हा व्हिडिओ अपलोड झाल्यावर पोलीस उपायुक्तांचा आम्हाला फोन आला आणि हॉटेल विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. पण त्याचसोबत माझ्या भावाच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला तसेच मी व्हिडिओ अपलोड करत असल्याने माझ्या विरोधातही अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या