Join us

'या' सिंगरने शेतकऱ्यांसाठी केली जेवणाची व्यवस्था, 'ब्रेड पकोडे' तळतानाचा व्हिडिओ केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2020 3:53 PM

शेतकरी कायद्यात सुधारणा करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत आणि त्यांना पाठिंबा देतानाचे रुपिंदर हांडाचे हे फोटोज अथवा व्हिडिओज टिकरी बॉर्डरवरील आहेत.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. या शेतकऱ्यांचे पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांनीही समर्थन केले आहे. अनेक पंजाबी सिंगर्सनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ गाणी गायली आहेत. तर आता सिंगर रुपिंदर हांडाने शेतकऱ्यांसाठी पोळ्या आणि ब्रेड पकोडे तयार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

यासंदर्भातील फोटो आणि व्हिडिओज स्वतः रुपिंदरनेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. शेतकरी कायद्यात सुधारणा करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत आणि त्यांना पाठिंबा देतानाचे रुपिंदर हांडाचे हे फोटोज अथवा व्हिडिओज टिकरी बॉर्डरवरील आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये रुपिंदरने लिहिले आहे, आजही लंगर सेवा देत आहोत. वाहेगुरू सर्वांचे भले करोत.

या व्हिडिओमध्ये रुपिंदर ब्रेड पकोडे बनवण्यासाठी बेसन फेटताना आणि नंतर पोळ्या करताना दिसत आहे. सोशल मीडियावर तिचे हे फोटो आणि व्हिडिओज जबरदस्त शेअर होत आहेत. पंजाबी सिंगर आपल्या गाण्यांच्या माध्यमाने तर शेतकऱ्यांना पाठिंबा देतच आहेत. याशिवाय ते त्यांना आर्थिक मदतही करत आहेत. 

दिलजीतने केली एक कोटी रुपयांची मदत -गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे.  या आंदोलनाला पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ याने सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला आहे. शनिवारी सिंधू सीमेवर त्याने शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांना उबदार कपडे विकत घेता यावेत आणि थंडीत रात्री थोडा आराम मिळावा यासाठी दिलजित दोसांझ याने १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

"आमची केंद्राला फक्त एकच विनंती आहे की, त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या. सर्व लोक याठिकाणी शांततेत बसले आहेत आणि संपूर्ण देश शेतकर्‍यांच्या पाठीशी आहे. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार, शेतकऱ्यांनी एक नवा इतिहास रचला आहे. हा इतिहास येणाऱ्या पिढ्यांना सांगितला जाईल," असेही दिलजीत दोसांझने म्हटले होते.

टॅग्स :शेतकरी संपशेतकरीपंजाब