Join us

Video: कॉन्सर्टमध्ये चाहत्याने गर्लफ्रेंडला अंगठी घालून केलं प्रपोज, श्रेया घोषाल म्हणाली- "मंत्र पण वाचायचे का?"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 12:11 PM

श्रेया घोषालने लाईव्ह कॉन्सर्टमध्ये एका चाहत्याला गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी खास मदत केलेली दिसली (shreya ghoshal)

बॉलिवूडची आघाडीची गायिका म्हणजे श्रेया घोषाल. सुरेल आवाजाने श्रेयाने गेली अनेक वर्ष लोकांच्या मनावर राज्य केलंय. श्रेयाची अनेक गाणी लोकांच्या प्लेलिस्टमध्ये हटकून असतातच. श्रेया सध्या जगभरात लाईव्ह कॉन्सर्ट करताना दिसते. तिची गाजलेली गाणी लाईव्ह ऐकायला हजारोंच्या संख्येने तिचे चाहते तिच्या कॉन्सर्टला गर्दी करताना दिसतात. अशातच नुकत्याच एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये श्रेयाने तिच्या चाहत्याला गर्लफ्रेंडला प्रपोज करायला मदत केली. 

श्रेया घोषालने चाहत्याला अशी केली मदत

श्रेया घोषालचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. या व्हिडीओत श्रेया तिच्या एका चाहत्याशी संवाद साधताना दिसतेय. यावेळी श्रेयाच्या कॉन्सर्टला उपस्थित असणाऱ्या चाहत्याच्या हातात एक बोर्ड होता. त्यावर लिहिलं होतं, "श्रेया माझं दुसरं प्रेम तू आहेस." श्रेयाची नजर त्या चाहत्यावर गेली. ती म्हणाली, "मी दुसरं प्रेम तर पहिलं प्रेम कोण आहे?" तेव्हा तो चाहता बाजूला असलेल्या मुलीकडे इशरा करतो. मग श्रेया त्या चाहत्याला मुलीला प्रपोज करायला प्रोत्साहन देते. "आता मी काय तुमच्यासाठी मंत्र वाचू?" असं श्रेया गमतीने चाहत्याला म्हणते. 

पुढे हजारोंच्या गर्दीसमोर तो चाहता गुडघ्यावर बसून मैत्रिणीच्या बोटात अंगठी घालून प्रपोज करतो. पुढे श्रेया त्या दोघांसाठी 'तुझ मे रब दिखता है' गाणं डेडीकेट करते. अशाप्रकारे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. श्रेयाच्या क्यूट वागण्याचं आणि प्रेमळ स्वभावाचं सगळीकडे कौतुक होतंय. श्रेया सध्या ALL Hearts टूरच्या  माध्यमातून देशभरात तिच्या गाण्यांचे लाईव्ह शो करत आहे. श्रेयाचे भारतातील चाहते तिच्या या कॉन्सर्टला भरभरून प्रतिसाद देत आहेत. 

टॅग्स :श्रेया घोषालबॉलिवूड