Join us

गायक विनोद राठोड नव्या चित्रपटासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 7:10 AM

हिंदी चित्रपटसृष्टीत संगीत क्षेत्रात अग्रगण्य नाव असलेले विनोद राठोड आता 'वो कौन है-दि मर्डर मिस्ट्री' या चित्रपटासाठी आपला आवाज ...

हिंदी चित्रपटसृष्टीत संगीत क्षेत्रात अग्रगण्य नाव असलेले विनोद राठोड आता 'वो कौन है-दि मर्डर मिस्ट्री' या चित्रपटासाठी आपला आवाज देणार आहेत. या चित्रपटाचं एक गाणं नुकतंच रेकॉर्ड करण्यात आलंय. कुमार सानू स्टुडिओमध्ये एका गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यात आलं असून संजय राज हे या गाण्याचे म्युजिक डिरेक्टर आहेत. या गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळेस चित्रपटाचे निर्माते पी.अभय कुमार आणि दिग्दर्शक डि.के.बर्नवाल हे सुद्धा उपस्थित होते.पी.अभय कुमार यांनी त्यांच्या वाढदिवसादिवशी या ‘वो कौन है-दि मर्डर मिस्ट्री’ या चित्रपटाचं नाव घोषित केलं.लवकरच या चित्रपटाचं चित्रिकरणही सुरू होणार आहे. तर या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत तेलुगू अभिनेत्री वृषाली गोस्वीमी असणार आहे. तिचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असल्याने ती प्रचंड उत्सुक आहे.त्याचप्रमाणे या चित्रपटाचे पहिलं गाणं विनोद राठोड यांनी रेकॉर्ड केलं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत संगीत क्षेत्रात विनोद राठोड यांनी आपलं स्थान निर्माण केलं आहे. त्यांचे वडिल पंडित चतुर्भूज राठोड यांच्याकडून त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी आजवर लता मंगेशकर, सुरेश वाडकर या  दिग्गज गायकांसोबतही काम केलं आहे. तसंच, साधना सरगम,अनुराधा पौडवाल, अलका याग्निक, कविता क्रिष्णामुर्थी यांच्यासोबतही त्यांनी गायन केलं आहे. पंडित चतुर्भूज राठोड यांच्या गायनाचा वारसा विनोद राठोड यांना मिळाला असल्याने त्यांना आजवर अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. तसेच, दोनवेळा फिल्मफेअर अॅवॉर्ड फॉर बेस्ट मेल प्लेबॅक सिंगरसाठी त्यांना नॉमिनेशनही मिळाले आहे. त्यांनी आजवर ३५०० हून अधिक गाणी विविध भाषेत गायली आहेत. हिंदी, मराठी, नेपाळी, इंग्रजी, गुजराथी, सिंधी, पंजाबी, बंगाली, ओरिया, तामिळ, कन्नड, तेलुगु, राजस्थानी, भोजपुरी आणि पर्शिअन आदी विविध भाषेत त्यांनी गायन केलेलं आहे. पी.अभयकुमार यांच्या या नव्या चित्रपटातही अजून गाणी ते गाणार असून त्याचंही रेकॉर्डिंग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मे महिन्यातच या चित्रपटाचे चित्रिकरणही सुरू झाले आहे.लघुपट बनवण्यातही अभय कुमार अग्रेसर असतात. क्राईम, विनोदी, भयपट, ड्रामा, रोमान्स अशा विविध विषयांवर त्यांनी आजवर चित्रपट बनवले आहेत.