दिवाळीच्या मुहुर्तावर बॉलिवूडमधील दोन बिग बजेट सिनेमे शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आले. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक प्रतिक्षेत असलेल्या अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' आणि कार्तिक आर्यनच्या 'भूल भूलैय्या ३' या चित्रपटांनी दिवाळीत बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. १ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या दोन्ही सिनेमांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. प्रदर्शनाच्या दिवसापासून अजय देवगण आणि कार्तिक आर्यनच्यासिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचं चित्र आहे.
'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३' हे दोन सीक्वेल असलेल्या सिनेमांची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. तगडी स्टारकास्ट आणि बिग बजेट असलेल्या या सिनेमांच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. 'सिंघम अगेन'मधून अॅक्शनच्या डबल डोसबरोबरच अख्खं बॉलिवूडच मोठ्या पडद्यावर अवरतलं. तर 'भूल भूलैय्या ३'मधून विद्या बालनच्या पुनरागमनासोबत माधुरी दीक्षितचं खास सरप्राइज चाहत्यांना मिळालं. या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांची पसंती मिळत असून बॉक्स ऑफिसवर सिनेमांमध्ये काटें की टक्कर पाहायला मिळत आहे.
प्रदर्शनाच्या दिवशी अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ४३.५ कोटींचा गल्ला जमवला. तर कार्तिक आर्यनच्या 'भूल भूलैय्या ३' सिनेमाने ३५.५ कोटींची कमाई केली. पहिल्या दिवशी सिंघम अगेन चित्रपट 'भूल भूलैय्या ३'पेक्षा वरचढ ठरला. तर दुसऱ्या दिवशीही चित्र काहीसं सारखंच आहे. दुसऱ्या दिवशी 'भूल भूलैय्या ३' सिनेमाने ३६.५० कोटी कमावले आहेत. तर 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या कमाईत थोडीशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. तरीही या सिनेमाने 'भूल भूलैय्या ३'पेक्षा जास्त कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' सिनेमाने ४१.५० कोटींचा गल्ला जमवला आहे.
दोन दिवसांनी 'भूल भूलैय्या ३' सिनेमाची एकूण कमाई ७२ कोटी झाली आहे. तर 'सिंघम अगेन' सिनेमाने ८५ कोटींचा गल्ला जमवला आहे. आता वीकेंडला हे दोन्ही सिनेमा किती कमाई करतात, आणि कोणता सिनेमा वरचढ ठरतो हे पाहावं लागेल.