बॉलिवूड अभिनेता मुरली शर्मा (Murli Sharma)ने अभिनय कौशल्याने बॉलिवूडच नाही तर साउथ इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. गोलमाल चित्रपटाच्या सीरिज आणि सिंघम मधील त्याच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. त्याने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. प्रभासच्या साहो या चित्रपटात देखील तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. त्याने हिंदीसोबतच अनेक साऊथच्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. मुरलीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तो मीडियापासून लांब राहणे पसंत करतो. फार कमी जणांना माहित आहे की त्याची पत्नीदेखील मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
मुरली शर्माच्या पत्नीचे नाव अश्विनी कळसेकर (Ashwini Kalsekar) आहे. तिने मराठी चित्रपटांतून तिच्या करियरची सुरुवात केली. तिने तिच्या करिअरच्या सुरुवातीला मराठी मालिकांमध्ये देखील काम केले. त्यानंतर तिला शांती या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेतील तिची भूमिका रसिकांना आवडली. पण तिला खऱ्या अर्थाने ओळख सीआयडी या मालिकेतून मिळाली. या मालिकेनंतर ती कसम से या मालिकेत झळकली. या मालिकेसाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. तिने मुसाफिर, अपहरण, फूंक, गोलमाल यांसारख्या बऱ्याच चित्रपटात काम केले आहे.
अश्विनी कळसेकर आणि मुरली शर्मा यांनी २००९ मध्ये विवाह केला. अश्विनीचे पहिले लग्न नितेश पांडे या अभिनेत्यासोबत झाले होते. त्याने साया, एक रिश्ता साझेदारी का या मालिकांमध्ये तर ओम शांती ओम या सिनेमात काम केले आहे. त्या दोघांचे १९९८ मध्ये लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आणि नितेशने अभिनेत्री अर्पिता पांडेसोबत लग्न केले. घटस्फोटानंतर काही वर्षांनी मुरली तिच्या आयुष्यात आला. त्या दोघांची चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर लग्नात झाले.