Ashok Samarth: 'सिंघम', 'राउडी राठोड' यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते म्हणजे अशोक समर्थ (Ashok Samarth). मराठीसह हिंदी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही ते बरेच सक्रिय आहे. इंडस्ट्रीतील बड्या अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केलंय. त्यांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. याबद्दल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी खुलासा केला आहे.
अशोक समर्थ यांनी 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या आयुष्यातील कठीण काळावर भाष्य केलं आहे. त्यादरम्यान मुलाखतीमध्ये ते म्हणाले, "मी जेव्हा कॉलेजला बारामतीला जायचो तर आज लोकांकडे आपण परफ्यूम मारतो. पण माझं परफ्यूम काय असेल? आमच्या अंगाचा शेण आणि गोमूत्राचा वास यायचा. कारण आमचं ते दैनंदिन जीवन होतं, पहाटे उठायचं तीन साडेतीन वाजता शेण गोळा करायचं जनावरांनी केलेलं गोमूत्र त्या शेणातच पडलेलं, अंगणामधला पालापाचोळा वैरण काढवा काठी हे काढणं. उकिरड्यावरती नेऊन खातासाठी ते टाकणं. मग आमची आंघोळ मग डबा आणि मग कॉलेजची पुस्तक आणि मग दप्तर, असं सगळं असायचं."
पुढे त्यांनी सांगितलं, "त्यामुळे हे इतकं ऑरगॅनिक परफ्यूम होतं. मग त्या ऑरगॅनिक परफ्यूमचा प्रभाव असणारी आम्ही माणसं या शहरामध्ये कशी टिकणार? कारण आमच्या अंगाच्या वासामुळे म्हणा किंवा आमच्या भाषेमुळे म्हणा आम्हाला कायमस्वरूपी एका अंतरावरतीच राहण्याची वेळ येते आणि हा अनुभव मी स्वतः केलेला आहे." असा खुलासा त्यांनी मुलाखतीमध्ये केला.