सिन्हा म्हणतात,‘चित्रपटाच्या कथानकाला फर्स्ट प्रायोरिटी’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2016 4:17 PM
‘तुम बिन जिया जाये कैसे?’ हे गाणं आठवतंय का? अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘तुम बिन’ चित्रपटातलं हे गाणं पंधरा वर्षांपूर्वी ...
‘तुम बिन जिया जाये कैसे?’ हे गाणं आठवतंय का? अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘तुम बिन’ चित्रपटातलं हे गाणं पंधरा वर्षांपूर्वी हिट झालं. चित्रपटाचे कथानक, संगीत, अभिनय यांच्यामुळे या गाण्याला यूट्यूबवर प्रचंड लाईक्स मिळाले. आता अनुभव सिन्हा ‘तुम बिन २’ घेऊन चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. पण, त्यांच्या मनात एक खंत आहे. आता ही खंत कुठली? तर चित्रपटाच्या कथानकाला प्राधान्य दिले जात नाही, ही. सध्या चित्रपटसृष्टीत कथानकाला ‘फर्स्ट प्रायोरिटी’ दिली जात नाही. संगीत, कास्टिंग यालाच आजचे दिग्दर्शक अतोनात महत्त्व देताना दिसतात, ही त्यांची खंत आहे. सध्या बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. पैसा कमविणे केवळ याच एका उद्देशाने चित्रपट केले जात आहेत. खरे तर चित्रपटाची स्टोरीलाईन दिग्दर्शकाला महत्त्वाची वाटायला हवी. पण आज भलत्याच गोष्टी दिग्दर्शक व कलाकारांना महत्त्वाच्या वाटू लागल्या आहेत, अशी खंत सिन्हा यांनी अलीकडे एका मुलाखतीत बोलून दाखवली.‘तुम बिन’ प्रदर्शित झाल्यानंतरचा त्यांचा अनुभवही त्यांनी यावेळी सांगितला. ते म्हणाले,‘ तुम बिन माझा बॉलिवूड डेब्यू होता. त्यातील सर्व कलाकारही नवीन होते. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे तो ‘लगान’,‘गदर- एक प्रेम कथा’,‘अक्स’, ‘यादें’ आणि ‘दिल चाहता हैं’ या चित्रपटांदरम्यान रिलीज होऊनही हिट झाला होता. याचे संपूर्ण श्रेय कथानकाला जाते. या चित्रपटाचा सिक्वेल कधी येणार, असे मला गेल्या अनेक वर्षांत कित्येकदा विचारले गेले. पण तेव्हा माझ्या डोक्यात खरच कुठलीही कल्पना नव्हती. पण शेवटी एक प्रेमकथा म्हटल्यावर स्टोरीलाईन मिळाली आणि पुढे आपोआप सगळे जुळून आले.’