आपल्या नृत्याने सितारा देवी यांनी अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. बॉलिवूडचा एक काळ त्यांनी अभिनयाने गाजवला. कथ्थक क्वीन म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. अभिनय आणि नृत्याने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं. करिअरमध्ये यशाचं शिखर गाठणाऱ्या सितारा देवी यांचं पर्सनल आयुष्य मात्र बोचणाऱ्या काट्यांनी भरलेलं होतं. चार लग्न करूनही त्यांना संसाराचं सुख काही मिळालं नाही. नेहमी त्यांच्या संसाराचा डाव हा अर्ध्यावरच मोडला.
सितारा देवी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२० रोजी कोलकातामध्ये झाला होता. दिवाळीत धनत्रयोदशीला जन्म झाल्याने त्यांचं नाव धनलक्ष्मी ठेवण्यात आलं होतं. पण, जन्मानंतर सितारा देवींचं तोंड वाकडं असल्याने आईवडिलांनी त्यांना घरातील कामवाली बाईला देऊन टाकलं होतं. पण, काही दिवसांनी त्या बाईने पुन्हा सितारा देवी यांना त्यांच्या आईवडिलांकडे आणून सोडलं. सितारा देवी यांचे वडील हे एक वैष्णव विद्वान आणि कथ्थक नर्तक होते. वडिलांकडूनच त्यांनी नृत्याचे धडे घेतले होते. नृत्यामुळे नावारुपाला आलेल्या सितारा देवींनी जवळपास २३ सिनेमांमध्ये काम केलं होतं.
४ लग्न होऊनही मिळालं नाही वैवाहिक सुख
सितारा देवी यांचं पहिलं लग्न बालपणी त्या ८ वर्षांच्या असताना झालं होतं. पण, त्यांनी लग्नाला विरोध करत शिक्षण सुरू ठेवलं होतं. त्यामुळे त्यांचे सासरच्या लोकांनी हे लग्न मोडलं. त्यानंतर सितारा देवी यांनी अभिनेता नजीर अहमद खान यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. नजीर यांच्याशी विवाह करण्यासाठी त्यांनी मुस्लीम धर्मही स्वीकारला होता. पण, त्यांचं हे लग्नही काही कारणांमुळे टिकू शकलं नाही.
नजीर यांच्या चुलत भावाबरोबरच सितारा देवींनी तिसऱ्यांदा संसार थाटला होता. पण, काही काळाने तलाक घेत ते वेगळे झाले. सितारा देवी यांनी हिंदू गुजराती प्रताप बारोट यांच्याशी चौथं लग्न केलं होतं. त्यांना रंजीत बारोट हा मुलगाही होता. पण, त्यांचं हे लग्नही टिकलं नाही.