अक्षय कुमारच्या आगामी 'स्काय फोर्स' सिनेमाची सध्या चांगलीच उत्सुकता आहे. या सिनेमात इंडियन एअर फोर्सच्या खऱ्या कामगिरीवर आधारीत कहाणी दिसणार आहे. काहीच दिवसांपूर्वी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि प्रेक्षकांची या सिनेमाविषयीची आतुरता शिगेला पोहोचली. 'स्काय फोर्स' सिनेमात इंडियन एअर फोर्समधील अजमादा बोपय्या देवय्या या धाडसी अधिकाऱ्याची शौर्यगाथा पाहायला मिळणार आहे. कोण होते ते? काय आहे त्यांची कहाणी? जाणून घ्या.
अजमादा बोपय्या देवय्या कोण होते?
अजमादा बोपय्या देवय्या हे भारतीय वायुसेनेतील साहसी पायलट होते. १९५४ साली ते वायुसेनेत पायलट म्हणून नियक्त झाले. १९६५ दरम्यान झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी वायुसेना फ्लाईंग कॉलेजमध्ये इतर अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग घेतलं होतं. याच युद्दात वरिष्ठ फ्लाइंग प्रशिक्षक म्हणून ते एका मिशनचा हिस्सा झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानी एअरबेस सरगोधावर हल्ला करण्यात आला.
याच युद्धादरम्यान पाकिस्तानी फ्लाइट लेफ्टनंट अजमादा हुसैन यांनी त्यांच्या एफ-१०४ फायटर प्लेनचा वापर करुन देवय्या यांचं विमान अडवलं. परंतु देवय्या यांनी पाकिस्तानी लेफ्टनंटचा हा हल्ला उलटवला आणि स्वतःचा बचाव केला. देवय्या यांनी नंतर पाकिस्तानी एअरबेसवर जोरदार हल्ला चढवला. परंतु या हल्ल्यात त्यांचं विमान कोसळलं. असं सांगण्यात येतं की, त्यांचा मृत्यू पाकिस्तानच्या भूमीवर झाला. परंतु आजवर त्यांचं पार्थिव सापडलं नाहीये.
मरणोत्तर महावीर चक्रने केला सन्मान
पुढे २३ वर्षांनंतर १९८८ साली अजमादा बोपय्या देवय्या यांचा मरणोत्तर महावीर चक्र देऊन सन्मान करण्यात आला. देवय्या हे भारतीय वायुसेनेतील एकमेव अधिकारी आहेत ज्यांना मरणोत्तर हा प्रतिष्ठेचा सन्मान देण्यात आला. देवय्या यांच्या शौर्य आणि बलिदानाची ही गाथा 'स्काय फोर्स' सिनेमातून पाहायला मिळेल. या सिनेमात वीर पहारियाने देवय्या यांची भूमिका साकारली आहे. अक्षय कुमार-वीर पहारियांची भूमिका असलेला 'स्काय फोर्स' सिनेमा २४ जानेवारी २०२५ ला रिलीज होतोय.