मुंबईच्या झोपडपट्टीतून निघून ऑस्कर अवार्ड्सपर्यंतचा प्रवास अनुभवलेला अजहरूद्दीन इस्माइल दुर्दैवाने पुन्हा एकदा गरिबीच्या दृष्टचक्रात अडकला आहे. होय, ‘स्लमडॉग मिलिनेयर’ या चित्रपटात आपल्याला काही बालकलाकार देखील पाहायला मिळाले होते. या चित्रपटात लतिकाच्या लहानपणीची भूमिका रुबीना अलीने साकारली होती. तर 10 वर्षांच्या अजहरूद्दीन याने छोट्या सलीमची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने अजहरूद्दीनला जगभर ओळख मिळवून दिली. पण ही ओळख फार काळ टिकली नाही. आता अजहर 21 वर्षांचा आहे. सहा महिन्यांपूर्वी आपला फ्लॅट विकून तो पुन्हा झोपडपट्टीतील अंधा-या गल्लीबोळात परतला आहे.
स्लमडॉग मिलिनेयरला मिळालेल्या जबरदस्त यशानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक डॅनी बॉयल यांनी ‘जय हो’ नामक ट्रस्ट स्थापन केला होता. रूबीना व अजहरूद्दीनची मदत करणे हा या ट्रस्टचा उद्देश होता. चित्रपट सुरु झाला तेव्हा रूबीना व अजहरूद्दीन दोघेही मुंबईच्या झोपडपट्टीत राहायचे. ट्रस्टने या दोघांचे आयुष्य फुलवण्याचा प्रयत्न केला. रूबीना व अजहरूद्दीन दोघांनाही फ्लॅट आणि मासिक भत्ता सुरु झाला. पण ‘स्लमडॉग मिलिनेयर ’च्या 12 वर्षांनंतर अजहर ट्रस्टकडून मिळालेला हा फ्लॅट विकून पुन्हा एकदा झोपडपट्टीत परतला आहे. केवळ इतकेच नाही तर तो ड्रग्ज आणि वाईट संगतीतही सापडला आहे.
मुंबई मिररने यासंदर्भात अजहरच्या आईची मुलाखत घेतली. यावेळी अजहरची आई शमीमाने लेकाची सगळी हकीकत सांगितली. तिने सांगितले की, अजहर नशेच्या आहारी गेला आहे. वाईट लोकांच्या संगतीत सापडला आहे. शिक्षणात त्याला रस नव्हता. त्याने लहानसा उद्योग सुरु केला. पण तोही बुडाला. आम्ही आर्थिक संकटात सापडलो. गेल्या तीन वर्षांत अजहर अनेकदा आजारी पडायचा. त्याच्या उपचारावर मी खूप खर्च केला. अजहर 18 वर्षांचा झाल्यावर ट्रस्टने त्याचा मासिक भत्ता बंद केला. आधी त्याला 9000 रूपये दरमहा भत्ता मिळायचा. भत्ता मिळणे बंद झाल्यावर आमच्यासाठी घर चालवणे कठीण झाले. आता आम्ही पुन्हा झोपडपट्टीत परतलो आहे. अजहरची को-स्टार रूबीना ही सुद्धा ट्रस्टने दिलेल्या फ्लॅटमधून नालासोपारामध्ये आपल्या आईसोबत राहतेय. 20 वर्षांची रूबीना मेकअप आर्टिस्ट आहे आणि फॅशन डिझाईनिंगचा कोर्स करतेय.
तिने सांगितले की, स्टारडम संपले आहे. आता मला माझे कुटुंब सांभाळण्यासाठी काम करावे लागते. मी फ्लॅटमध्ये चार वर्षे राहिली. पण 8 लोकांसोबत त्या फ्लॅटमध्ये राहणे कठीण झाले होते. त्यामुळे मी तिथून बाहेर पडले. ट्रस्ट अधिकृतरित्या बंद झाला आहे. पण ते लोक अद्यापही माझ्या संपर्कात आहेत आणि आजही माझ्या मदतीसाठी प्रयत्न करत आहेत.