‘मेरा नाम जोकर’ म्हणत बालवयातच सिनेसृष्टीला त्यांनी आपल्या कसदार अभिनयाची झलक दाखवून दिली. कधी चॉकलेट हीरो तर कधी खलनायक म्हणून ‘खेल खेल में’ प्रत्येक भूमिका बेमालूमपणे साकारली आणि ‘हम भी किसीसे कम नहीं’ हे दाखवून दिले. काळानुरूप ‘बदलते रिश्ते’ ओळखत अभिनयासोबत दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण केले. जिद्दीने कर्करोगाशी झुंज देणारा त्यांच्यातील ‘जिंदा दिल’ माणूस रसिक प्रेक्षकांना विशेष भावला. अखेर ‘आ अब लौट चले’ म्हणत त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र, सिनेसृष्टीतील या खुल्लमखुल्ला व्यक्तिमत्त्वाची अदाकारी कधीच विसरता येणार नाही, ‘ये वादा रहा’ अशीच भावना प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून राहिली आहे.>असा अभिनेता होणे नाहीबॉलीवूडचे मोठे घराणे म्हणून ओळखल्या जाणाºया कपूर घराण्यातील राज कपूर यांचे पुत्र ऋषी कपूर. ‘श्री ४२०’ या पहिल्याच चित्रपटात आपल्या वडिलांच्या लहानपणाची भूमिका साकारताना तो निळ्या डोळ्यांचा, गोल चेहरा आणि चेहºयावर स्मितहास्य असलेला ‘चिंटू’ सर्वांना भावला. या भूमिकेसाठी त्याला ‘उत्कृष्ट बालकलाकारा’चा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यानंतर ३ वर्षांनी अभिनेता म्हणून आलेल्या ‘बॉबी’ या पहिल्याच चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला.अभिनयाचे संस्कार बालपणापासूनच होते, पण चित्रपटसृष्टीत यशस्वी होण्यासाठी अभिनयाची क्षमता लागते हे ऋषी कपूर यांनी सुरुवातीलाच ओळखले होते. ‘बॉबी’चित्रपटात डिंपल कपाडियासोबतच्या पदार्पणानंतर तरुणींच्या गळ्यातील ते ताईत बनले. १९७३च्या ‘बॉबी’पासून ते २००० पर्यंत ते रोमँटिक नायकाची भूमिका करीत होते. यादरम्यान त्यांनी ९२ चित्रपटांत काम केले. पैकी ५१ चित्रपटांत ते एकटेच नायक होते, तर ४१ बहुनायक चित्रपट होते. यादरम्यान त्यांनी त्या वेळच्या जवळपास सर्वच अभिनेत्रींसोबत नायक म्हणून काम केले. १२ चित्रपटांत एकत्र काम करणाºया अभिनेत्री नीतू सिंगशी त्यांनी विवाह केला.>कामासोबतच कुटुंबीयांकडेही त्यांचे तेवढेच लक्ष होते. ते कधीही सायंकाळी ६ नंतर शूटिंग करीत नसत. ऋषी कपूर यांची बहुतांश गाणी सुपरहिट झाली होती. प्रत्येकाच्या तोंडात त्यांची गाणी असायची. त्यांच्यासाठी आघाडीच्या सर्व गायकांनी पार्श्वगायन केले होते, पण शैलेंद्र सिंग यांचा आवाज त्यांना सर्वांत जवळचा वाटायचा.2000पर्यंत रोमँटिक भूमिका साकारल्यानंतर दुसºया इनिंगमध्ये त्यांनी साहाय्यक अभिनेता म्हणून भूमिका साकारायला सुरुवात केली. त्यातही त्यांच्या अभिनयाचे वैविध्य दिसून आले. मग ती ‘नमस्ते लंडन’मधील वडिलांची भूमिका असो, ‘औरंगजेब’मधील लाचखाऊ पोलीस अधिकारी असो, ‘हाउसफुल्ल २’मधील विनोदी भूमिका असो, ‘स्टुडंट आॅफ द ईअर’मधील ‘डीन’ असो, ‘अग्निपथ’मधील ‘रौफ लाला’ असो किंवा ‘डी- डे’मधील डॉन असो. त्यांची प्रत्येक भूमिका रसिक प्रेक्षकांच्या काळजात घर करून राहिली.
- उरल्या केवळ आठवणी...
आमच्या काळात तरुणाईच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे, लोकप्रिय अभिनेता आणि माझे जुने मित्र ऋषी कपूर यांच्या निधनाच्या बातमीने मी अंतर्बाह्य हादरून गेलो आहे. काल इरफान आणि आज ऋषी कपूर. दोघांनाही कर्करोगाने आपल्यापासून दूर नेले. खूपच वाईट आहे हा कर्करोग. यानेच ज्योत्स्नालाही माझ्यापासून हिरावून घेतले. माझे जीवन सुने केले. मला खूप मोठा धक्का बसला आहे. ऋषी कपूरचे जाणे हे माझ्यासाठी वैयक्तिक खूप मोठे नुकसान आहे. ते चांगला माणूस आणि विश्वासू मित्र होते. प्रत्येक बातमीबाबत जागरूक आणि संवेदनशील होते. जेव्हा ते कारकीर्दीच्या शिखरावर होते तेव्हाही मी त्यांना जेथे बोलावले तेथे हसतमुखाने आले. यवतमाळच्या यात्रेची तर नेहमीच चर्चा करायचे. कपूर कुटुंबीय आणि माझ्या कुटुंबाच्या निकटच्या संबंधांना त्यांनी नवा आयाम दिला. काळाने घातलेल्या या घाल्यातून बाहेर पडण्यासाठी ईश्वर नीतू आणि रणबीरला शक्ती देवो. माझ्या मित्राच्या तर आता केवळ आठवणीच उरल्या आहेत. खोली बंद आहे आणि चावी कुठेतरी हरवली आहे. माझ्या दोस्ता, तुला विनम्र श्रद्धांजली.- विजय दर्डा, लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि राज्यसभेचे माजी खासदार>शेवटच्या क्षणापर्यंत डॉक्टर, नर्सेसचे केले मनोरंजन : ऋषी कपूर यांनी शेकडो चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अखेरच्या क्षणापर्यंत चाहत्यांचे मनोरंजन करण्याचा ध्यास त्यांनी पूर्ण केला़ होय, कपूर कुटुंबाने जारी केलेल्या निवेदनानुसार, अखेरचा श्वास घेईपर्यंत रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेसचे ते मनोरंजन करीत होते़ ऋषी कपूर यांची प्रकृती बुधवारी रात्री अचानक बिघडली़ त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले़ त्यांच्यावर उपचार करणाºया डॉक्टर व नर्सेसनी दिलेल्या माहितीनुसार, ते शेवटपर्यंत हसत-खेळत बोलत होते,़ विनोद करत होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सर्वांचे मनोरंजन केले़ गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते़ या उपचारादरम्यानही त्यांच्या चेहºयावर कधीच निराशा, ताण, वेदना दिसल्या नाहीत़ खिलाडू वृत्तीने आणि अतिशय धैर्याने ते या आजाराला सामोरे गेले. कुटुंब, मित्रांसोबत मौजमस्ती आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ चाखणे व चित्रपट पाहणे एवढेच अखेरच्या दिवसांत त्यांनी केले़ आजारपणात त्यांना भेटणारा प्रत्येक जण ऋषी कपूर यांच्यातील उत्साह, ऊर्मी पाहून अवाक् होत असे. जगभरातील चाहत्यांनी भरभरून दिलेल्या प्रेमामुळे ते गहिवरून जात असत. जगातून गेल्यावर मला लोकांनी माझ्या डोळ्यांतील अश्रूंसाठी नाही, तर माझ्या चेहºयावरच्या हास्यासाठी आठवणीत ठेवावे, हे जणू त्यांनी मनाशी पक्के ठरविले होते, त्यामुळेच की काय, पण शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या चेहºयावर हास्य कायम होते़