केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठी जिंकून इतिहास रचला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभूत करून स्मृती इराणींनीही ही जागा जिंकली. या विजयानंतर स्मृती यांनी १४ किमी. पायी चालत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. १४ किमी. अनवाणी चालत त्यांनी सिद्धिविनायक मंदिर गाठले. स्मृती यांची मैत्रिण आणि टीव्ही निर्माती एकता कपूरने याबाबतची माहिती दिली. एकताने स्मृती यांच्यासोबतचा एक फोटो आणि व्हिडीओ शेअर केला.
हे माझे रवीसोबतचे (एकताचा मुलगा) पहिले सिद्धीविनायक दर्शन होते. तो चार महिन्यांचा झाला आहे. मी त्याची खास मावशी आहे, असेही त्या व्हिडीओत सांगत आहेत. या व्हिडीओत स्मृती गाडीच्या समोरच्या सीटवर बसलेल्या आहेत. मागून एकता त्यांचा व्हिडीओ शूट करतेय. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकताने स्मृती यांना खास अंदाजात शुभेच्छा दिल्या होत्या. या शुभेच्छा देताना एकताने स्मृती इराणी यांच्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेच्या टायटल सॉन्गची ओळ लिहिली होती. नात्यांचे स्वरूप बदलते. एक पीढी येते, एक पीढी जाते...नवी कहाणी रचली जाते, असेही तिने लिहिले होते.एक खास मनोकामना पूर्ण झाल्याने स्मृती सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या, हे त्यांनी सांगितले. पण ही मनोकामना कोणती, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. अर्थात ही मनोकामना कोणती, हे समजायला लोकांना वेळ लागला नाही. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना पराभूत करून अमेठी जिंकणे, यापेक्षा मोठी मनोकामना कुठली असू शकते. अमेठी काँग्रेसचा गड मानला जात होता. पण स्मृतींनी काँग्रेसचा हा गड ध्वस्त केला आणि राहुल गांधीना विक्रमी मतांनी हरवत, त्यांनी हा गड जिंकला.