बीड - प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर-खान हिच्याविरोधात बीडमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. करिना कपूरने तिच्या पुस्तकावर पवित्र बायबलचे नाव वापरल्याने तिच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. करिना कपूर हिने तिच्या गर्भावस्थेतील अनुभव शेअर करणारे पुस्तक लिहिले आहे. या पुस्ताकाला तिने करिना कपूर-खान्स प्रेग्नंसी बायबल असं नाव दिलं आहे, या नावावरच आक्षेप घेण्यात आला असून, अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाकडून करिनाविरोधात तक्रार देण्यात आली आहे.
करिना कपूरच्या या पुस्तकाविरोधात बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अल्फा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी ही तक्रार दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात तातडीने गुन्ह्याची नोंद व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.
अभिनेत्री करीना कपूर ही काही महिन्यांपूर्वीच दुसऱ्यांदा आई झाली होती. त्यानंतर काही दिवसांतच तिचे गरोदरपणावर लिहिलेलं पुस्तक प्रकाशित झाले आहे. करिनाने स्वत: या पुस्तकाची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. हे पुस्तक म्हणजे माझं तिसरं मुलं असल्याचंही ती म्हणाली होती.
काय आहे वाद...करिना कपूरने तिच्या दोन्ही प्रेग्नंसी काळातील अनुभवांच्या आधारावर ‘Kareena Kapoor Khan’s Pregnancy Bible’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाच्या नावावरून आता वाद निर्माण झाला आहे. ऑल इंडिया मायनॉरिटी बोर्डाने पुस्तकाच्या नावातील ‘बायबल’ या शब्दावर आक्षेप घेतला आहे. ऑल इंडिया मायनॉरिटी बोर्डचे अध्यक्ष डायमंड युसुफ यांनी कानपूरमध्ये एका बैठकीच आयोजन केलं होतं. या बैठकीत करीनाच्या पुस्तकाचा विरोध करण्यात आला. पुस्तकाचं नाव ‘प्रेग्नंसी बायबल’ ठेवल्याबद्दल करिनाचा कडक शब्दांत निषेध करण्यात आला होत.