‘अमितकुमार लाइव्ह इन कॉन्सर्ट’ ही अमित कुमार यांनी त्यांचे वडील व प्रख्यात गायक किशोर कुमार यांना वाहिलेली एक विशेष अशी आदरांजली आहे. त्या माध्यमातून ‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’ (सीपीएए)साठी निधीसंकलन केले जाणार आहे. हा कार्यक्रम वांद्रे येथील रंगशारदा सभागृह येथे २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
अमित कुमार हे एक आघाडीचे गायक कलाकार आहेत. ते म्हणतात, “मी सामाजिक कामांना सहकार्य करण्यासाठी नेहमीच आघाडीवर राहिलो आहे. त्या माध्यमातून समाजामध्ये बदल घडवून आणण्यावर माझा भर असतो. सीपीएएबरोबर सहकार्य करत असल्याचा मला अभिमान आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे पैसे उभे राहतील त्यांचा वापर गरीब घरातील आणि कर्करोगाने ग्रस्त महिलांवरील उपचार व मदतीसाठी केला जाणार आहे. त्या माध्यमातून त्यांना एक चांगले आयुष्य जगण्याची संधी प्राप्त होईल. जेव्हा जेव्हा शक्य असते तेव्हा समाजाचे देणे फेडण्याचा माझा प्रयत्न असतो. संगीत हा जनजागृती करण्याचे आणि सामाजिक काम करण्यासाठीचे एक उत्तम व्यासपीठ आहे,” असेही ते म्हणाले.
अमित कुमार यांनी स्वतःला भारतीय पार्श्वसंगीत क्षेत्रातील एक आघाडीचे पार्श्वगायक, अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून स्थापित केले आहे. १९९५पासून ते लाईव्ह ऑर्केस्ट्रा करत आले आहेत. त्यांनी जगभरात कार्यक्रम केले आहेत आणि करत असतात. हिंदीबरोबरच त्यांनी बंगाली, भोजपुरी, ओडिसा, आसामी, मराठी आणि कोंकणी या भाषांमध्येही गायन केले आहे.