Join us

गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये बनावट पनीर? इन्फ्लुएन्सरचा दावा; हॉटेलने केली अशी कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 10:46 IST

शिल्पा शेट्टी, विराट कोहली आणि बॉबी देओलच्या रेस्टॉरंटमध्येही केलं परीक्षण

मनोरंजनसृष्टी असो, खेळ असो किंवा अन्य कोणत्याही प्रोफेशनमधील दिग्गज सेलिब्रिटींचे अनेक ठिकाणी स्वत:च्या मालकीचे रेस्टॉरंट्स आहेत. ते स्वत: या रेस्टॉरंटची जाहिरात करतात. सेलिब्रिटींचं रेस्टॉरंट म्हटलं की महागडं, आलिशान आणि चांगल्या गुणवत्तेचंच असणार अशीच अपेक्षा असते. गौरी खान (Gauri Khan), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), बॉबी देओल (Bobby Deol) ते विराट कोहली (Virat Kohli) अशा अनेक सेलिब्रिटींची मुंबईतही रेस्टॉरंट्स आहेत. नुकतंच एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने या रेस्टॉरंट्समध्ये जाऊन तिथलं पनीर भेसळयुक्त आहे की नाही याचं परीक्षण केलं. यामध्ये गौरी खानच्या 'टोरी' (Torii)  हॉटेलमधलं पनीर चक्क बनावट निघालं.

आजकाल सगळीकडे भेसळयुक्त पनीर कोणतं याचं परीक्षण केलं जात आहे. कोणीही घरबसल्या हे परीक्षण करु शकतं. पनीरच्या तुकड्यावर आयोडिनचा थेंब टाकून त्याचा रंग बघितला जातो.  नुकतंच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सार्थक सचदेवाने (Sarthak Sachdeva) हे परीक्षण केलं. सर्वात आधी तो विराट कोहली ONE8Commune मध्ये गेला. तिथे त्याने पनीर राईस मागवला. यातून त्याने पनीर काढून पाण्यात बुडवलं. नंतर ते काढून त्यावर आयोडिनचे थेंब टाकून बघितलं. ते पनीर बनावट नव्हतं. 

आता तो शिल्पा शेट्टीच्या 'बॅस्टियन'मध्ये गेला. इथे त्याने हजार रुपयांची पनीरची डिश मागवली. इथेही त्याने पनीरचं परीक्षण केलं. तेव्हा हे पनीरही चांगलंच निघालं. बनावट नव्हतं.

पुढे बॉबी देओलच्या रेस्टॉरंटमध्ये त्याने पनीर चिली मागवलं. पनीरवरील सर्व आवरण काढून त्याने ते पाण्यात घातलं. नंतर आयोडिनचे थेंब टाकून परीक्षण केलं. हेही पनीर चांगलं होतं.

शेवटी तो शाहरुख खानची पत्नी, प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर गौरी खानच्या 'टोरी' रेस्टॉरंटमध्ये गेला. इथे त्याने पनीरची फॅन्सी डिश मागवली. नंतर पनीरचं परीक्षण केलं आणि बघतो तर काय त्याचा रंग काळा निळा झाला. हे पनीर बनावट आहे पाहून त्यालाही धक्का बसला. 

या व्हिडिओवर टोरी रेस्टॉरंटनेच कमेंट करत स्पष्टीकरण दिलं आहे. ते लिहितात, "आयोडिन परीक्षणाने पनीरमधलं स्टार्चचं प्रमाण तपासलं जातं ना की त्याची गुणवत्ता. या डिशमध्ये सोया मिक्स असल्याने ते तसं दिसलं. आमच्या रेस्टॉरंटमध्ये पनीरची गुणवत्ता चांगलीच आहे यावर आम्ही ठाम आहोत." 

टॅग्स :गौरी खानमुंबईसोशल मीडिया