Join us

जावेद अख्तर म्हणाले, महाराष्ट्राकडून शिका; नेटकरी म्हणाले, विनोद करू नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2021 4:08 PM

Javed Jkhtar Tweet : संपूर्ण देशात सध्या कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळतोय. स्थिती बिकट आहे. अशास्थितीत गीतकार जावेद अख्तर यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

ठळक मुद्दे यापूर्वी अनेकदा जावेद यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर थेट टीका केली आहे. कोरोना काळातही ते मोदी सरकारला वारंवार धारेवर धरत आहेत.   

संपूर्ण देशात सध्या कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळतोय. स्थिती बिकट आहे. कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढतेय आणि त्यातुलनेत आरोग्य व्यवस्था अपुरी पडू लागलीये. औषधांचा, ऑक्सिजनचा आणि रूग्णालयातील बेड्सचा प्रचंड तुटवडा आहे. अशास्थितीत बॉलिवूडचे प्रख्यात गीतकार जावेद अख्तर ( Javed Akhtar) यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्राकडून इतरांनीही शिकायला हवे, असा सणसणीत टोला त्यांनी केंद्राला लगावलाय.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जावेद अख्तर यांनी एक ट्विट केले आणि त्यांचे हे ट्विट क्षणात व्हायरल झाले. या ट्विटरमध्ये त्यांनी महाराष्ट्र सरकारचे कौतुक करत, केंद्राला अप्रत्यक्षणपणे टोला लगावला आहे.‘महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. तरी देखील सरकार आणि बीएमसी जबरदस्त क्षमतेने काम करत आहेत. इतरांनीही त्यांच्याकडून काहीतरी शिकायला हवे,’ अशा आशयाचे ट्विट करत जावेद अख्तर यांनी महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले.

लोकांनी केले ट्रोल

अर्थात काहींना जावेद अख्तर यांचे हे ट्विट आवडले नाही. अनेक सोशल मीडिया युजर्सनी त्यांना यासाठी ट्रोल केले. ‘महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रूग्ण आहेत, सर्वाधिक मृत्यू नोंदवले गेले आहेत. अशात महाराष्ट्राकडून काय शिकायचे?’ असा सवाल एका युजरने त्यांना केला. 

अन्य एका युजरने जावेद यांचे ट्विट म्हणजे, ‘जोक ऑफ द डे’ असल्याचे म्हणत त्यांना आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला. एका युजरने तर थेट हे पेड ट्विट आहे का? असा बोचरा सवाल जावेद अख्तर यांना केला. यापूर्वी अनेकदा जावेद यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर थेट टीका केली आहे. कोरोना काळातही ते मोदी सरकारला वारंवार धारेवर धरत आहेत.   

 

टॅग्स :जावेद अख्तरमहाराष्ट्र