आई प्रसिद्ध अभिनेत्री आणि वडील क्रिकेटर असणाऱ्या सोहा अली खानने बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. मुस्लीम असलेल्या सोहाने हिंदू धर्मीय कुणाल खेमूसोबत लग्न करत संसार थाटला. पण, लग्नाला इतकी वर्ष होऊनही अजूनही सोहाला आंतरधर्मीय विवाहावरुन ट्रोल केलं जातं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोहाने याबाबत भाष्य केलं.
सोहाने नुकतीच स्क्रीनला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सततच्या होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. ती म्हणाली, "आता मला याची सवय झाली आहे. त्यामुळे आता मला त्रास होत नाही. पण, एका गोष्ट मला हैराण करते. ती म्हणजे जेव्हा मी पोस्ट करते तेव्हा लोक धर्मावरुन कमेंट करतात. कारण, मी एका हिंदू कुटुंबात लग्न केलं आहे. माझी आई हिंदू होती पण तिने एका मुस्लीम व्यक्तीसोबत लग्न केलं होतं".
"जेव्हा आम्ही दिवाळीच्या पोस्ट करतो तेव्हा कमेंट असतात की तुम्ही आजपर्यंत किती वेळा रोजाचा उपवास ठेवला आहे? आम्ही होळीच्या पोस्ट केल्यावर तुम्ही कसे मुसलमान आहात, अशा कमेंट्स असतात. यामुळे मला त्रास होत नाही. पण, या गोष्टींकडे माझं लक्ष जातं", असंही सोहाने पुढे सांगितलं. दरम्यान सोहाने अभिनेता कुणाल खेमूसोबत २०१५ मध्ये लग्न केलं होतं. त्यांना इनाया ही मुलगीदेखील आहे.