अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता सोहेल खान आज आपला 51वा वाढदिवस (Sohail khan birthday ) साजरा करतो. सोहेल खान म्हणायला अभिनेता आणि निर्माता आहे. पण सलमान खानचा (Salman khan) भाऊ हीच त्याची ओळख जास्त मोठी आहे. सोहेलने अनेक चित्रपटात भूमिका केल्यात. पण त्याला म्हणावे तसे यश लाभले नाही. अर्थात आज आम्ही सोहेलच्या फिल्मी करिअरबद्दल नाही तर त्याच्या लव्हलाईफबद्दल सांगणार आहोत. होय, घरच्यांचा विरोध पत्करून सोहेलने लग्न केले.
सोहेल खानने 1997 मध्ये दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली. ‘प्यार किया तो डरना क्या’ हा दिग्दर्शक म्हणून त्याचा पहिला सिनेमा होता. याच दरम्यान एक मुलगी फॅशन डिझाईनिंगमध्ये करिअर करण्यासाठी दिल्लीतून मुंबईला आली. तिचं नाव होतं सीमा सचदेव. सोहेल व तिची योगायोगाने भेट झाली आणि पहिल्याच नजरेत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले, लवकरच दोघांनी एकमेकांना डेट करणं सुरू केलं होतं. दोघांना लग्न करायचं होतं. पण सीमाच्या घरचे लोक या लग्नासाठी अजिबात तयार नव्हते.
त्यामुळे सीमा आणि सोहेलने एक मोठा निर्णय घेतला. ज्या दिवशी सोहेलचा 'प्यार किया तो डरना क्या' सिनेमा रिलीज झाला त्याच दिवशी दोघे घरातून पळून गेले होते आणि दोघांनी आर्य समाज मंदिरात लग्न केलं. यानंतर मध्यरात्री दोघांच्या लग्नासाठी मौलवीचेही अपहरण करण्यात आले. नंतर दोघांच्या घरवाल्यांनी हे नातं स्वीकारलं. या कपलने नंतर निकाह सुद्धा केला होता. आता त्यांना निर्वाण आणि योहान ही दोन मुले आहेत.