आगामी 'तुंबाड' चित्रपटात अभिनेता सोहम शाह अत्यंत अनोख्या अवतारात दिसत आहे. यात महाराष्ट्रातील कोकणस्थ ब्राम्हण परिधान करतात अशा पारंपरिक वेशभूषेत तो वावरतोय. ही व्यक्तीरेखा साकारताना त्याला खूप मेहनत करावी लागली.
चित्रपटाच्या कथेनुसार सोहमला भर पावसात एक महत्त्वाचा सीन शूट करायचा होता. जवळपास याचे चित्रीकरण महिनाभर चालले. सतत भिजल्यामुळे त्याची तब्येत खराब झाली. परंतु त्याने हार मानली नाही. त्याही परिस्थितीत तो शूट करतच राहिला. पावसातल्या शूटींगचा अनुभव सांगताना सोहम म्हणाला, 'काही महिन्यापासून आम्ही पावसात शूटिंग करीत होतो. सीनमध्ये सातत्य राखणे गरजेचे होते. असेही प्रसंग होते जिथे मला कपडे सुखवावे लागायचे आणि पुन्हा मला ओले करावे लागायचे. एक प्रसंग असा आला की पाऊस माझ्यासाठी धोकादायक बनत चालला होता. यामुळेच मी देवाकडे प्रार्थना करत होतो की, मला पुन्हा पावसात शूट करावे लागू नये.''
'तुंबाड'ची कथा ही १९२०च्या काळातील आहे. पुण्यातील एका प्रतिष्ठित बाह्मण कुटुंबाच्या तीन पिढ्यांच्या अवती- भवती फिरणारी ही कथा आहे. त्यामुळे एकंदरीत या थरारपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढवली आहे. यात सोहम शाहसोबत ज्योती माळे, अनिता दाते, दीपक दामले आणि रंजिनी चक्रवर्ती यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रातच झाले आहे. १२ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राही अनिल बर्वे आणि निर्मिती आनंद एल राय यांनी केली आहे. 'तुंबाड' चित्रपट १२ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.