सहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’! पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर!!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 06:32 PM2018-08-21T18:32:54+5:302018-08-21T18:33:14+5:30
आनंद गांधी दिग्दर्शित ‘शिप आॅफ थिसियस’ या अनेकार्थाने गाजलेल्या चित्रपटातून आपली नवी ओळख निर्माण करणारा अभिनेता सोहम शाह एक अनोखा चित्रपट घेऊन येतोय. होय, या चित्रपटाचे नाव आहे, ‘तुम्बाड’.
आनंद गांधी दिग्दर्शित ‘शिप आॅफ थिसियस’ या अनेकार्थाने गाजलेल्या चित्रपटातून आपली नवी ओळख निर्माण करणारा अभिनेता सोहम शाह एक अनोखा चित्रपट घेऊन येतोय. होय, या चित्रपटाचे नाव आहे, ‘तुम्बाड’. या चित्रपटाचा टीजर आज लॉन्च झाला. हा टीजर कमालीचा रहस्यमयी व रोमांचक आहे. ‘तुम्बाड’च्या टीजरने या चित्रपटाबद्दलची उत्कंठा आणखीच वाढली आहे. टीजरमध्ये सोहम पृथ्वीच्या गर्भातून जन्मलेल्या १६ कोटी देवी-देवतांबद्दल सांगतोय.
पृथ्वी देवीच्या गर्भातून १६ कोटी देव-देवतांनी जन्म घेतला. पण पृथ्वी देवीचे आपल्या पहिल्या संततीवर सर्वाधिक प्रेम होते. अनेक युगं गेलीत पण तो पृथ्वी देवीच्या कुशीत झोपून राहिला. पण एकेदिवशी आपल्या पूर्वजांनी त्याला चिरनिदे्रतून जागे केले. कारण त्याचा शाप आपल्यासाठी वरदान होते, असे सोहम यात सांगतोय. तूर्तास ‘तुम्बाड’च्या या टीजरची जोरदार प्रशंसा होतेय. राजकुमार हिराणी, आनंद एल राय आणि अनुराग कश्यप आदी दिग्दर्शकांनी याचे कौतुक केले आहे.
व्हिजुअली मी इतका रोमांचक चित्रपट बघितला नाही. सोहमने सर्वोत्तम काम केले आहे. आनंद एल राय यांनीही अंगावर रोमांच उभे करणारा चित्रपट, अशा शब्दांत याची प्रशंसा केली आहे. आनंद एल राय आणि सोहम या चित्रपटाचे निर्माते आहेत. अनुराग कश्यपने ट्विटरवर याचा टीजर शेअर करत, यास ‘गेम चेंजर’ म्हटले आहे.
‘तुम्बाड’ची कथा १९२० च्या काळातील आहे. पुण्यातील एका प्रतिष्ठित ब्राह्मण कुटुंबाच्या तीन पिढ्यांच्या अवती-भवती फिरणारी एक कथा यात आहे. येत्या १२ आॅक्टोबरला हा चित्रपट रिलीज होतो आहे.
सोहम शाहचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट सहा वर्षांपासून पाईपलाईनमध्ये होता. राही अनिल बर्वेने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात सोहम शाहसोबत ज्योती माळसे, अनीता दाते, दीपक दामले अणि रंजिनी चक्रवर्ती मुख्य भूमिकेत आहेत.