बलात्कारप्रकरणी काही स्टार्स भडकले तर काहींनी दिल्या उलट-सुलट प्रतिक्रिया !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 12:46 PM
-रवींद्र मोरे देशात दिवसागणिक वाढणाऱ्या बलात्काराच्या घटनांबद्दल आता सर्वच स्तरातून असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. वृत्तपत्रांपासून ते वृत्तवाहिन्यांपर्यंत, गल्लीबोळापासून ...
-रवींद्र मोरे देशात दिवसागणिक वाढणाऱ्या बलात्काराच्या घटनांबद्दल आता सर्वच स्तरातून असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. वृत्तपत्रांपासून ते वृत्तवाहिन्यांपर्यंत, गल्लीबोळापासून ते राजकीय पटलापर्यंत याविषयीच्याच चर्चा सुरु आहेत. विशेष म्हणजे कलाविश्वातील काही दिग्गज स्टार्सनी याविषयी आपले मत मांडून या घटनांचा तिव्र निषेध व्यक्त केला, तर काहींनी दिल्या उलट-सुलट प्रतिक्रिया..* अमिताभ बच्चन गेल्या आठवड्यात एका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिताभ बच्चन यांना कठुआ बलात्कार प्रकरणी प्रश्न विचारला होता. त्यानंतर या सगळ्या प्रकरणावर बोलण्यासही आपल्याला दहशत वाटते असे हताश उद्गार अमिताभ बच्चन यांनी काढले होते. कठुआ बलात्कार प्रकरणी काय प्रतिक्रिया देणार? हे सगळे प्रकरण अत्यंत घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणारे आहे. मला या प्रकरणाबद्दल बोलण्याचीही दहशत वाटते इतके हे प्रकरण लांछनास्पद आहे अशी प्रतिक्रिया बच्चन यांनी दिली होती. * नसिरुद्दीन शाह ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी, ‘दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांविषयी पोलिसांमध्ये होणाऱ्या तक्रारींची वाढती संख्या ही गोष्ट एका अर्थी सकारात्मक बाब आहे’, असं म्हणत त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ‘होप और हम’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याच्या वेळी त्यांनी कठुआ बलात्कार प्रकरणी आपलं मत मांडलं. ‘बलात्कार आपल्यासाठी नवा शब्द किंवा नवी गोष्ट नाही. ही दुष्कृत्य नेहमीच होत असतात. पण, हल्लीच्या दिवसांमध्ये सकारात्मक बाब म्हणजे याविषयी खुलेपणाने बोललं जात सर्वस्वी व्यक्तिगत मत असल्याचं त्यांनी न विसरता सांगितलं.* हेमामालिनी ‘अलीकडच्या काळात मुलींवरील बलात्काराच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब असली तरी सध्या अशा घटनांना जास्तच प्रसिद्धी दिली जात आहे. कदाचित पूर्वीही बलात्काराच्या अशाच घटना घडूनही त्या इतक्या प्रकाशझोतात आल्या नाहीत’, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या खासदार तथा अभिनेत्री हेमामालिनी यांनी केले आहे. मथुरा येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या हेमामालिनी यांना बलात्काराच्या वाढत्या घटनांबाबत विचारले असता त्यांनी त्यावर चिंता व्यक्त केली. * आलिया भट आगामी ‘राझी’ या चित्रपटातील गाणं लाँच करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आलिया भटनेही बलात्कार प्रकरणाविषयी संताप व्यक्त केला. माणुसकीच्या दृष्टीनेही विचार करायचा झाला तर प्रत्येक ठिकाणाहून या घटनेविषयी चीड आणि संताप पाहायला मिळत असल्याचं सांगत ही अतिशय लाजिरवाणी आणि भीतीदायक गोष्ट असल्याचं तिने स्पष्ट केलं. ‘एक महिला, एक मुलगी, एक व्यक्ती आणि समाजाचा एक भाग असल्याच्या जाणिवेने मला अतिव दु:ख होत आहे. जेव्हापासून मला या सर्व प्रकरणाविषयी माहिती मिळाली, मी त्याविषयी बऱ्याच गोष्टी वाचल्या. पण, गेल्या दोन दिवसांपासून मात्र मी त्याविषयी वाचणं सोडून दिलं आहे. माझ्या मते त्या घटनेविषयी मी आणखी वाचत राहिले तर वारंवार त्याच एका गोष्टीची आठवण होऊन मी दु:खी, अस्वस्थ होईन’, असं ती म्हणाली.* रफ्तार सिंग कठुआ बलात्कार प्रकरणाविषयी पॉर्न साइटवर काहीजणांनी सर्च केलं असून, यातून पुन्हा एकदा राक्षसी वृत्तीचा चेहरा सर्वांसमोर आला आहे. अतिशय गंभीर अशा या मुद्द्यावर रॅपर रफ्तार सिंगने संताप व्यक्त केला आहे. त्याने इन्स्टाग्राम पोस्ट पाहता रफ्तारचं रक्त खवळल्याचं लगेचच लक्षात आलं. रफ्तारने यासंबंधीचा एक स्क्रिनशॉट शेअर करत, ‘ही आहे माझ्या देशाची विचारसरणी, भारतात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे’, अशी पोस्ट केली. ‘एखादी गोष्ट ट्रेंडमध्ये तेव्हाच येते जेव्हा तिच्याविषयी जास्तीत जास्त वेळा सर्च केलं जातं. सद्यस्थिती पाहता तुम्हीच सर्वजण याचा अंदाज लावू शकता की, अनेकांच्याच डोक्यात किती घाणेरडे विचार चाळवले आहेत’, असं म्हणत रफ्तारने संताप व्यक्त केला. * रेणुका शहाणे सोशल मीडियावर आपल्या भूमिका स्पष्टपणे मांडणाऱ्या रेणुका यांनी बलात्काराविषयीची एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी आपले जळजळीत विचार सर्वांसमोर मांडले आहेत. ह्यबलात्कार करणाऱ्या व्यक्तीचा किंवा पीडितेचा धर्म कधीही महत्त्वाचा नसतो. किंवा ते कोणत्या राजकीय पक्षाची साथ देता यालाही फारसं महत्त्वं नसतं. बलात्कार हा मानवतेविरोधात केलेला गुन्हा आहे. बलात्काराचं कृत्यच मुळात अमानवी आहे. बलात्कार करणाऱ्या कोणत्याच व्यक्तीला जगण्याचाही अधिकार नाही. किंबहुना अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना जगूच दिलं नाही पाहिजे. बलात्कार करणाऱ्या, त्यासाठी मदत करणाऱ्या, बलात्काराचे पुरावे मिटवणाऱ्या आणि त्याविषयी मौन बाळगणाऱ्यांना समाजातूनच संपवण्याची गरज आहे’, असं रेणुका यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.