Sonakshi Sinha and Zaheer Iqbal Wedding : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नुकताच सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केलं. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर या दोघांनी लग्न करत आपल्या आयुष्यात नवीन सुरुवात केली आहे. जहीर हा मुस्लिम तर सोनाक्षी ही हिंदू आहे. यातच आता सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्या लव्हस्टोरीची चर्चा रंगली आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांनी 9 जुलै 1980 रोजी अभिनेत्री पूनम चंदिरामणीसोबत लग्न केलं होतं. पण, त्याआधी एका मुस्लिम अभिनेत्रीवर शत्रुघ्न सिन्हा यांचा जीव जडला होता. ती अभिनेत्री म्हणजे रीना रॉय.रीना रॉय या मुस्लिम असून त्यांचे खरे नाव सायरा अली आहे. एक काळ होता जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांचं नाव रीना रॉयशी जोडलं गेलं होतं. त्यावेळी दोघेही इंडस्ट्रीतील खास जोडप्यांपैकी एक होते.
शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांनी 1976 मध्ये रिलीज झालेल्या 'कालीचरण' या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं आणि या चित्रपटापासून दोघांमध्ये जवळीक वाढू लागली आणि त्यांनी जवळपास 7 वर्षे एकमेकांना डेट केलं. दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं होतं. पण, अचानक त्यांचं नात तुटलं. शत्रुघ्न सिन्हा यांनी रीना रॉयला सोडून अभिनेत्री पूनम सिन्हा यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर देखील शत्रुघ्न यांच्या आयुष्यात रिना यांचे स्थान कायम होते. खामोशः द शत्रुघ्न सिन्हा या शत्रुघ्न सिन्हा यांच्या बायोग्राफीमध्ये देखील शत्रुघ्न आणि रिना यांच्या अफेअरचा उल्लेख करण्यात आला आहे.
एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांचं आणि रीना रॉयचं नातं मान्य केलं होतं. ते म्हणाले, 'रीनासोबतचं माझं नातं वैयक्तिक आहे. मी भाग्यवान आहे की त्यांनी मला आयुष्याची 7 वर्षे दिली'. शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम म्हणाली, 'जेव्हा मला त्यांच्या अफेअरची माहिती मिळाली, तेव्हा मी त्यांच्यापासून दूर गेले होते. परंतु शत्रूंना अशा मुलीशी लग्न करायचं नव्हतं. जिच्यावर त्यांचा विश्वास नव्हता. लग्नानंतरही त्याचं अफेअर होतं हे मला माहीत होतं'.