सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले आणि त्यांच्या आयुष्याचा नवा टप्पा सुरू झाला. सोनाक्षीच्या लग्नात तिची बेस्ट फ्रेंड हुमा कुरेशी ही करवली म्हणून मिरवली. आता हुमाच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सोनाक्षी आणि जहीरसाठी हुमानं एक खास फोटो शेअर करत त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनाक्षीच्या लग्नात आणि रिसेप्शन पार्टीत सर्वांच्या नजरा या अभिनेत्रीची बेस्टी हुमा कुरेशीवर खिळल्या होत्या. हुमा कुरेशीने तिच्या बेस्टीच्या रिसेप्शनमध्ये पांढरा आणि क्रीम रंगाचा ड्रेस परिधान केला. या लुकला एकीकडे पारंपारिक टच होता. तिचा लूकच नाही तर मैत्रिणीसाठी तिच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंदही मन जिंकण्यासाठी पुरेसा होता. आता हुमाने सोनाक्षी आणि झहिरचे अभिनंदन करणारी एक पोस्ट शेअर केली, या पोस्टवर नवविवाहित जोडप्यानेही कमेंट केली. त्यामुळे ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हुमाने सोनाक्षी सिन्हा आणि जहीर यांचा एक सुंदर फोटो शेअर केला. तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, 'दोन अतिशय वेगळी व्यक्तिमत्त्वे...दोन अनोखे आत्मे...पण...तुम्ही दोघे एकत्र असता तेव्हा उत्तम असता. या सुंदर प्रेमकथेची साक्षीदार झाल्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे... माझे मित्र हे आता पती-पत्नी झाले आहेत'. हुमाच्या या पोस्टवर जहीर इक्बालने हार्ट इमोजी शेअर करत 'हमज्ज, लव्ह यू' असे लिहिलं. तर सोनाक्षीनं, 'लव्ह यू बेबी' असं लिहतं तीन हार्ट इमोजी अशी कमेंट केली.
फक्त हुमाचं नाही तर तिचा भाऊ साकिब सलीमदेखील सोनाक्षीच्या लग्नात हजर होता. ऐवढचं नाही तर साकिब याने सोनाक्षीच्या भावाचं कर्तव्य पार पाडलं. सोनाक्षी-जहीरच्या लग्नाचा एक व्हिडीओ समोर आला असून यात साकिब हा लग्नातील प्रथा पार पाडताना दिसून आला. सध्या सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि चाहते या सुंदर जोडप्याला सहजीवनासाठी शुभेच्छा देत आहेत.