बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha ). सध्या सोनाक्षी तिच्या हिरामंडीमधील अभिनयामुळे चर्चेत येत आहे. संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडीमध्ये फरीदन ही भूमिका साकारुन तिने तुफान लोकप्रियता मिळवली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती सातत्याने चर्चेत येत आहे. नुकताच सोनाक्षीने तिचा ३७ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्त तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील अनेक गोष्टी चर्चिल्या जात आहेत.आज फिटनेस आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सोनाक्षीला कुटुंबाकडूनच अभिनयाचा वारसा मिळाला आहे. अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची लेक असलेल्या सोनाक्षीला सुद्धा इंडस्ट्रीमध्येच करिअर करायचं होतं. मात्र, तिचं वजन तिच्या या मार्गात अडथळा ठरत होतं. अखरे सलमानने दिलेल्या सल्ल्यामुळे सोनाक्षीने तिच्या वाढलेल्या शरीरारवर लक्ष दिलं आणि तिने चक्क ९५ किलो असलेलं वजन ३० किलोने कमी केलं होतं.
सलमानने सोनाक्षीला दिला सल्ला
सोनाक्षीने २०१० मध्ये दबंग या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. यावेळी तिने सलमान खानसोबत स्क्रीन शेअर केली होती. बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या या सिनेमासाठी सिलेक्ट होणं सोनाक्षीसाठी वाटतं तितकं सोपं नव्हतं. द कपिल शर्मा शोमध्ये सोनाक्षीने याविषयी भाष्य केलं होतं. यावेळी तिने सलमानच्या एका सल्ल्यामुळे मी वजन कमी करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं.
काय होता भाईजानने दिलेला सल्ला
"सलमान खानला त्याच्या सिनेमात मला घ्यायचं होतं. पण, माझं वाढलेलं वजन यात अडथळा येत होता. त्यामुळे त्याने माझ्यासमोर एक अट ठेवली होती. तो मला भेटला आणि त्याने मला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. सोबतच तू वजन कमी केलं तर तुला माझ्या सिनेमात कास्ट करेन", असंही त्याने म्हटल्याचं सोनाक्षीने सांगितलं.
दरम्यान, सोनाक्षी ज्यावेळी १८ वर्षांची होती. त्यावेळी तिचं वजन ९५ किलो इतकं होतं. परंतु, दबंग सिनेमासाठी तिने तिचं वजन ३० किलो घटवलं होतं. सोनाक्षीने तिच्या करिअरमध्ये अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. यात राऊडी राठोड, सन ऑफ सरदार, आर. राजकुमार, कलंक, लुटेरा, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई, मिशन मंगल. दबंग फ्रेंचाइजी आणि हिरामंडी यांसारख्या सिनेमा, वेबसीरिजमध्ये तिने काम केलं आहे.