Join us

"...पण तुम्हाला रामाच्या शिकवणीचा विसर पडलाय", सोनाक्षी सिन्हाने मुकेश खन्नांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 10:36 IST

'रामायण'चा तो प्रश्न, मुकेश खन्नांनी काढले शत्रुघ्न सिन्हा यांचे संस्कार, भडकलेली सोनाक्षी म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अभिनेते मुकेश खन्ना यांना चोख उत्तर दिलं आहे. काही वर्षांपूर्वी सोनाक्षीला केबीसी या शोमध्ये विचारण्यात आलेल्या रामायण बाबतच्या प्रश्नाचं उत्तर देता न आल्यामुळे तिला ट्रोल केलं गेलं होतं. त्याबाबत इतक्या वर्षांनी आता मुकेश खन्ना यांनी एका मुलाखतीत भाष्य करत सोनाक्षीचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यानंतर सोनाक्षीने पोस्ट शेअर करत मुकेश खन्ना याना उत्तर दिलं आहे. 

काय म्हणाली सोनाक्षी सिन्हा?

मुकेश खन्ना सर, 

मी नुकतंच तुम्ही केलेलं विधान वाचलं. मी काही वर्षांपूर्वी एका शोमध्ये रामायणबाबत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाही, यात माझ्या वडिलांची चूक आहे, असं तुम्ही म्हणाला. 

पहिलं तर मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की त्या दिवशी त्या हॉट सीटवर दोन महिला बसल्या होत्या. त्या दोघींनाही रामायणाबाबत विचारलेल्या त्या प्रश्नाचं अचूक उत्तर माहीत नव्हतं. पण, तुम्ही फक्त माझं नाव घेतलं. त्याचं कारणही मला माहीत आहे. 

हो, कदाचित त्या दिवशी मला काही आठवेनासं झालं असेल. जसं अनेकांबरोबर होतं. त्यामुळे संजीवनी बुटी कोणासाठी आणली होती, हे मी विसरले. पण, तुम्हाला देखील भगवान राम यांनी दिलेल्या शिकवणीचा विसर पडला आहे. 

जर राम मंथराला माफ करू शकतो, कैकयीला माफ करू शकतो, एवढ्या मोठ्या युद्धानंतर जर तो रावणाला माफ करू शकतो...तर या गोष्टींच्या तुलनेत अगदी छोटी असलेली ही गोष्ट तुम्ही सोडू शकला असता. तुम्ही मला माफ करावं, अशी माझी इच्छा नाही. पण, तुम्ही हे आता विसरा आणि सारखं सारखं या गोष्टीबद्दल बोलून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करू नका. 

आणि शेवटचं म्हणजे पुढच्या वेळी माझ्या वडिलांनी मला काय शिकवण दिली याबाबत बोलायचं असेल तर हे विसरू नका की हे त्यांचेच संस्कार आहेत. ज्यामुळे तुम्ही माझ्या संस्काराबद्दल बोलल्यानंतरही मी एवढ्या आदरपूर्वक हे बोलत आहे. 

मुकेश खन्ना नेमकं काय म्हणाले होते?

मुकेश खन्ना यांनी सिद्धार्थ कननला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी शक्तिमान हे आजच्या पिढीसाठी किती महत्त्वाचा आहे, याबाबत बोलताना सोनाक्षीचं उदाहरण दिलं होतं. ते म्हणाले, "आजच्या पिढीला फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमध्ये रस आहे. एका मुलीला भगवान हनुमानाने संजीवनी बुटी कुणासाठी आणली होती, हेदेखील माहीत नव्हतं. हे त्या मुलीच्या संस्कारांमुळे झालं आहे. तिच्या वडिलांचे नाव शत्रुघ्न सिन्हा आहे तिच्या भावांची नावे लव आणि कुश आहेत तरी तिला रामायणाबद्दल नीट माहिती नाही. पण मी म्हणेन की यात तिच्या वडिलांची चूक आहे. त्यांनी त्यांच्या मुलांना हे का शिकवलं नाही? ते इतके आधुनिक का झाले? जर मी आज शक्तिमान असतो, तर मी मुलांना बसवून भारतीय संस्कृती आणि सनातन धर्म शिकवला असता.”

नेमकं प्रकरण काय? 

सोनाक्षी सिन्हा २०१९ मध्ये कौन बनेगा करोडपतीमध्ये आली होती. यामध्ये तिला “रामायणानुसार हनुमानाने संजीवनी बुटी कुणासाठी आणली होती?” असा प्रश्न विचारला गेला होता. A.सुग्रीव B.लक्ष्मण C.सीता D.राम असे चार पर्याय देण्यात आले होते. पण, या प्रश्नाचं अचूक उत्तर माहीत नसल्याने सोनाक्षीने लाइफलाइनचा वापर केला होता. त्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं होतं. 

टॅग्स :सोनाक्षी सिन्हामुकेश खन्नाशत्रुघ्न सिन्हारामायण