अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) तिच्या विविध भूमिकांसाठी ओळखली जाते. 'दबंग' सिनेमातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. गेल्या वर्षी आलेल्या 'हीरामंडी' सीरिजमधील तिच्या कामाचं कौतुक झालं. गेल्या वर्षी जून महिन्यात तिने बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत लग्नगाठ बांधली. यावरुन तिला टीकेला सामोरं जावं लागलं होतं. तसंच तिचे वडील खुद्द शत्रुघ्न सिन्हा तिच्या लग्नाच्या विरोधात होते अशी चर्चा झाली. यावर सोनाक्षीने एका मुलाखतीत सत्य सांगितलं आहे.
'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षी सिन्हा म्हणाली, "मी जहीरला डेट करतीये आणि मला त्याच्याशी लग्न करायचं आहे हे वडिलांना सांगायला मला खूप भीती वाटत होती. माझा आईला आमच्याबद्दल आधीपासून माहित होतं. बाबांना थोडी कल्पना होती. मला वाटलं ती स्वत:च बाबांना सांगेल. माझं काम हलकं करेल. पण नेमकं तिने हे बाबांना सांगितलंच नाही. ती म्हणाली की तुझी गोष्ट आहे तर तूच सांग."
lती पुढे म्हणाली, "मी जहीरकडे गेले आणि म्हटलं की तू माझ्या बाबांना सांग. तो म्हणाला की, 'मी माझ्या बाबांना सांगेल आणि तू तुझ्या असं आहे ना'. मी खूप घाबरले होते. माझ्या बाबांसोबत मी याआधी कधीच जहीरबद्दल बोलले नव्हते. मग हिंमत करुन मी बोलायला गेले आणि मला धक्काच बसला. त्यांनी खूप शांत आणि समजूतदारपणे सांगितलं की तुम्ही दोघंही मोठे आहात, तुमचं एकमेकांवर प्रेम आहे हेच महत्वाचं आहे. तू तुझा निर्णय घेतला आहेस तर ठिके, मला जहीरला भेटायला आवडेल. मग जहीर बाबांना भेटायला आला. "
सोनाक्षी आणि जहीरने मुंबईतील घरातच रजिस्टर मॅरेज केलं. स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत त्यांचं लग्न झालं. यामध्ये कोणालाही धर्म बदलावा लागला नाही. लग्नात शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा दोघांनी लेकीला आशीर्वाद दिला. मात्र यावेळी सोनाक्षीचे भाऊ दिसले नाहीत. ते अजूनही नाराज असल्याच्या चर्चा आहेत. सोनाक्षी सध्या जहीरसोबत सुखाचा संसार करत आहे.