सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधील नेपोटिझमवरून नवा वाद सुरु झाला आहे. सुशांतला बॉलिवूडमधील काही लोकांनी नेस्तनाबूत केले, त्याला आत्महत्येसाठी भाग पाडले, असे आरोप होत आहेत. करण जोहर, सलमान खान, एकता कपूर, आलिया भट असे अनेक कलाकार प्रचंड ट्रोल होत आहेत. या कलाकारांच्या फॉलोअर्सची संख्याही कमी झाली आहे. अशात बॉलिवूडच्या काही कलाकारांनी या ट्रोलिंगला कंटाळून ट्विटरवरून पळ काढल्याचे दिसतेय. सोनाक्षी सिन्हा, सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा, जहीर इक्बाल, साकिब सलीम अशा अनेकांनी आपले ट्विटर अकाऊंट्स अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केले आहे.
‘आग लगे बस्ती मे, मै अपने मस्ती मे. बाय ट्विटर’, असे म्हणत सोनाक्षीने ट्विटरला रामराम ठोकला. ‘मानसिक आरोग्य राखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते नकारात्मकतेपासून दूर राहणे. ट्विटरवर या दिवसांत प्रचंड नकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे मी माझे अकाऊंट डिअॅक्टिवेट करत आहे. बाय, पीस आऊट,’ असे तिने ट्विटर डिअॅक्टिव्हेट करण्यापूर्वीच्या शेवटच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.सलमानचा मेहुणा आयुष शर्मा, सलमानच्या अगदी जवळचा अभिनेता जहीर इक्बाल यांनीही त्यांचे ट्विटर अकाऊंट बंद केले आहे.
आयुषने त्याच्या शेवटच्या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. ‘ 280 कॅरेक्टर्स कुठल्याही व्यक्तिचे वर्णन करण्यात अपुरे आहेत. पण 280 कॅरेक्टर्स फेक न्यूज, द्वेष आणि नकारात्मकता पसरवण्यासाठी पुरेसे आहेत. या मानसिकेसाठी साईन अप केले नव्हते. खुदा हाफिज,’ असे आयुषने लिहिले आहे.
सलमान खानने लॉन्च केलेल्या आणि ‘नोटबुक’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या जहीर इक्बालने ‘अलविदा ट्विटर’म्हणत ट्विटरला रामराम ठोकला आहे. या सर्वांनी ट्रोलिंगला कंटाळून ट्विटर सोडल्याचे मानले जात आहे.सुशांतच्या आत्महत्येनंतर करण जोहर, सलमान, आलिया शिवाय अनेक स्टार किड्स प्रचंड ट्रोल होत आहेत. बॉलिवूडमध्ये नेपोटिझमच्या आधारावर फक्त स्टार किड्सनाच संधी दिली जाते आणि कोणत्याही गॉडफादरशिवाय बॉलिवूडमध्ये नाव कमावण्याचा प्रयत्न करणा-्या आउटसायडर्ससोबत हे लोक भेदभाव करतात. सुशांत सुद्धा याच नेपोटिझमची शिकार झाला होता, असा आरोप होत आहे़ त्यामुळे सध्या हा मुद्दा वादाचा विषय ठरला आहे.