सोशल मीडियावर ट्रोल होणे, सेलिब्रिटींसाठी नवी गोष्ट राहिलेले नाही. सोनम कपूरही याला अपवाद नाही. कधी फॅशन सेन्स तर कधी परखड विचार यामुळे सोनम कायम ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. अलीकडे सोनमने अरबाज खानच्या ‘पिंच’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये अरबाजने सोनमबद्दल ट्रोलर्सने केलेल्या कमेंटमध्ये वाचून दाखवल्या. एका कमेंटमध्ये ट्रोलर्सने सोनमला फ्लॉप अॅक्ट्रेस म्हटले होते. पण सोनमवर या कमेंटचा काहीही परिणाम झाला नाही. उलट तिने ही कमेंट करणाऱ्या ट्रोलर्सला त्याच्याच शब्दांत उत्तर दिले.
‘भारतातच नाही तर जगात वातावरण बिघडलेले आहे. आयुष्यातला ताणतणाव वाढला आहे. जीवघेणी स्पर्धा आहे आणि यात सगळे एकमेकांना मागे सारून पुढे जाण्याच्या प्रयत्नांत आहे. ज्यांनी आयुष्यात काही मिळवले किंवा काही मिळवण्याचा प्रयत्न करताहेत, हे लोकांना पाहावत नाही. समोरचा चांगला करतोय म्हटल्यावर ते खपत नाही. आधी मी ट्रोलिंगमुळे अपसेट व्हायचे. पण आता मला जराही फरक पडत नाही. मी कुणालाच गंभीरपणे घेत नाही. प्रार्थनेवर माझा विश्वास आहे. जगातील नकारात्मकता समूळ नष्ट व्हावी, इतकी एकच प्रार्थना मी करेल,’ असे सोनम म्हणाली.