ब-याचदा सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं. कधी सेलिब्रेटींचाही स्टाइल स्टेटमेंट फसतं आणि त्याची खिल्ली उडवली जाते. बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हणून ओळखली जाणारी मस्सकली अभिनेत्री सोनम कपूरला ब-याच वेळा तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे ट्रोल केले जाते. कधी डेनिम साडी, कधी विविधरंगी वन-पीस आणि आकर्षक ड्रेस यामुळे सोनमच्या फॅशन सेन्सची कायमच चर्चा असते. सोनमने नुकतेच फोटोशूट केले आहे. यात तिने लाँग वाइट शर्ट आणि गाउन ड्रेप कॉम्बिनेशन असलेला ड्रेस परिधान केला आहे.
याच ड्रेसमुळे सोनमला खुप ट्रोल केले जात आहे. इतकेच नाही तर नेटीझन्स कमेंट करत तिच्या या ड्रेसची खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुळात सोनमच्या पाठी असलेला पडदा आणि तिने घातलेला ड्रेस हा अगदी पडद्याला मॅच होत असल्यामुळे तिची खिल्ली उडवली जात आहे. अशा प्रकारे ट्रोल करणे हे काही पहिल्यांदा झाले असे नाही तर याआधीही सोनमला अनेक वेळा तिच्या फॅशन एक्सपेरिमेंटविषयी ट्रोल केले गेले आहे. मात्र सोनमला या गोष्टींनी काहीच फरक पडत नसून ती वेगवेगळ्या लूकमध्ये आपले फोटो शेअर करत असल्याचे पाहायला मिळते.
तसेच लवकरच सोनम पहिल्यांदा साऊथ सुपरस्टार दुलकर सलमानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. चित्रपटाची कथा अनुजा चौहान लिखित ‘जोया फॅक्टर’ या कादंबरीवर बेतलेली आहे. सोनम यात एका अॅड एक्झिक्युटीव्हची भूमिका साकारताना दिसणार आहे. जी पुढे भारतीय क्रिकेट टीमसाठी लकी चार्म ठरते. दुलकर सलमान यात क्रिकेट टीमच्या कर्णधाराची भूमिका साकारतोय. साऊथ इंडस्ट्रीचा आघाडीचा स्टार दुलकर सलमानने अलीकडे ‘कारवां’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. त्यामुळे ‘जोया फॅक्टर’ हा त्याचा दुसरा बॉलिवूडपट असणार आहे.