सीएए आणि एनआरसी या कायद्याला विरोधाचे केंद्र झालेल्या शाहीन बागमध्ये गोळीबार झाल्यानंतर देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आता यात अभिनेत्री सोनम कपूर हिनेही उडी घेतली आहे.शाहीन बागमध्ये गोळीबारानंतर ट्विटरवर सोनम कपूरने असा काही संताप व्यक्त केला की, तिचे ट्विट क्षणात व्हायरल झाले. ‘मी कधी कल्पनाही केली नव्हती की भारतात असे काही घडेल. कृपया देशातील फुटीचे राजकारण थांबवा. हे देशात द्वेष पसरवणारे आहे. तुम्ही स्वत:ला हिंदू समजत असाल तर हे लक्षात घ्या की हा धर्म आपल्याला धर्मासोबतच कर्मही शिकवतो. हे जे काही चाललेय ते या दोन्ही पैकी एकही नाही,’ असे तिने तिच्या ट्विटमध्ये लिहिले.
‘राजकारण समजत नसेल तर तू करु नकोस, असे एका नेटक-याने तिच्या पोस्टला उत्तर देताना लिहिले. तर अन्य एकाने,‘आम्ही काय करावं हे तू आम्हाला शिकवू नकोस,’ अशा शब्दांत सोनमचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. काही युजर्सनी तिला काश्मिरी हिंदू पंडितांचा दाखला दिला. ‘काश्मीरमधून हिंदू पंडितांना पळवून लावल्याची घटना तू विसरलीस का?’,अशा शब्दांत त्यांनी तिला ट्रोल केले. जामीया विद्यापीठ परिसरात झालेल्या गोळीबाराचे प्रकरण ताजे असतानाच शाहीन बागमध्येही असाच प्रकार झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. जामीया विद्यापीठात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या सीएए विरोधात निदर्शने सुरू असताना एका युवकाने गोळीबार केला. या गोळीबारात एक तरुण जखमी झाला होता.जामीयामध्ये गोळीबार करणा-या त्या माथेफिरू तरुणाचा सत्कार करण्यात येणार असल्याची घोषणा हिंदू महासभेने केली. या विद्यापीठाच्या परिसरात निदर्शने सुरु असताना हा तरुणमध्ये घुसला होता.