Join us

सोनम कपूरचं रुपेरी पडद्यावर लवकरच कमबॅक, यशराज टॅलेंटसोबत केली हातमिळवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 2:19 PM

Sonam Kapoor : सोनम कपूरच्या करिअरचे संपूर्ण व्यवस्थापन आता वायआरएफ टॅलेंटतर्फे केले जाणार आहे.

सोनम कपूर (Sonam Kapoor) ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण त्याची कारकीर्द काही खास राहिली नाही. तिने आपल्या करिअरमध्ये फार कमी हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मुलाला जन्म दिल्यानंतर ही अभिनेत्री पडद्यावरून गायब आहे. अशा परिस्थितीत सोनम कपूरने यशराज टॅलेंटशी हातमिळवणी केली आहे.

सोनम कपूरच्या करिअरचे संपूर्ण व्यवस्थापन आता वायआरएफ टॅलेंटतर्फे केले जाणार आहे. सध्याच्या काळातील 'स्टार-मेकर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुटिक एजन्सी वायआरएफ टॅलेंटने यापूर्वी रानी मुखर्जी, अनुष्का शर्मा, रणवीर सिंग, आयुष्मान खुर्राना, भूमी पेडणेकर ह्यांसारख्या उत्कृष्ट अभिनेत्यांच्या करिअरचे व्यवस्थापन केले आहे. ही टीम आता 'ब्रॅण्ड सोनम कपूर’ला स्थानिक व जागतिक स्तरावर आकार देण्यासाठी लक्ष केंद्रित करणार आहे. वायआरएफने प्रथमच त्यांनी लाँच न केलेल्या अभिनेत्रीशी असा करार केला आहे. वायआरएफ टॅलंट शर्वरी आणि अहान पांडे यांसारख्या नवोदित अभिनेत्यांच्या करिअरचे व्यवस्थापनही करत आहे. या दोघांकडे भारतातील भविष्यकालीन स्टार्स म्हणून बघितले जात आहे. सोनमचे पुनरागमन दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांद्वारे होणार आहे. त्यासंदर्भातील तपशील अद्याप बाहेर आलेले नाहीत.

सोनमला एक चाकोरीबाह्य ब्रॅण्ड ओळख मिळवून देण्यावर वायआरएफ टॅलेंट बारकाईने काम करणार आहे. सर्व बाबतीत 'कूल’ असणे ही तिच्या ब्रॅण्डची ओळख आहे. फिल्म्सच्या निवडीपासून ते सर्वांत मोठ्या जागतिक फॅशन व लग्झरी ब्रॅण्ड्सशी असलेल्या तिच्या नैसर्गिक समन्वयापर्यंत आणि एक स्वतंत्र विचारांची काम करणारी आई म्हणून जीवनशैलीच्या निवडीपर्यंत सगळे काही 'कूल’ आहे. सोनम कामाच्या ठिकाणी नेहमीच स्त्रियांच्या पाठीशी उभी राहिली आहे. त्यामुळे ती स्त्रिया व त्यांच्या हक्कांची पुरस्कर्तीही आहे.

टॅलेंट अँड कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी विभागाचे उपाध्यक्ष पृथ्वीश गांगुली यांनी या बातमीला दुजोरा दिला. ते म्हणाले, “सोनम कपूर चित्रपटसृष्टीत परत येण्याच्या मार्गावर असताना तिच्यासोबत जोडून घेणे रोमांचक आहे. सोनम एक ब्रॅण्ड म्हणून अनन्यसाधारण व खूपच उत्साह वाढवणारी आहे. एक कलावंत म्हणून तिच्यासोबत काम करता येणार याचा आम्हाला आनंद वाटतो. आम्ही तिच्या करिअरचे संपूर्ण व्यवस्थापन करणार आहोत आणि तिच्यासाठी जागतिक स्तरावर ब्रॅण्ड धोरण विकसित करणार आहोत.”

टॅग्स :सोनम कपूर