Join us

"माझ्यापासून दूर राहा", विवाहित महेश भट यांच्या प्रेमात पडलेल्या सोनी राजदान, दिग्दर्शकाने दिलेली ताकीद, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 12:51 PM

सोनी राजदान आणि महेश भट यांचा विवाह 1986 मध्ये झाला. त्यावेळी महेश भट्ट यांचे पहिलं लग्न झालेले होते. त्यांना दोन मुलंदेखील होती.

बॉलिवूड अभिनेत्री सोनी राजदान या आज त्यांचा 66 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोनी राजदान ही महेश भट्ट यांची दुसरी पत्नी आणि आलियाची आई आहे. सोनीने 36 चौरंगी लेन या इंग्रजी चित्रपटातून पदार्पण केले. श्याम बेनेगल यांचा १९८३ मध्ये प्रदर्शित झालेला 'मंडी' हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता.

1984 मध्ये आलेल्या 'सारांश' या चित्रपटातही त्यांनी काम केले होते, ज्यामुळे त्या खूप चर्चेत आल्या होत्या. याशिवाय त्यांनी 80 च्या दशकातील हिट टीव्ही सीरियल बुनियादमध्येही काम केले होते. 2018 मध्ये आलेल्या 'राझी' चित्रपटात आलियाच्या मुलीच्या ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारली होती.

सोनी राजदान आणि महेश भट यांचा विवाह 1986 मध्ये झाला. त्यावेळी महेश भट्ट यांचे पहिलं लग्न झालेले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव किरण भट आहे. महेश भट्ट यांनी 1984 मध्ये 'सारांश' चित्रपटाच्या सेटवर सोनी यांची पहिली भेट घेतली होती. या चित्रपटाचे ते दिग्दर्शक होते. या सिनेमात अनुपम खेर आणि सोनी मुख्य भूमिकेत होत्या. 

एका मुलाखती दरम्यान सोनी राजदान म्हणाल्या होत्या, महेश भट यांनी त्यांची सिनेमात काम मिळण्यासाठी कोणतीच मदत केली नाही. चित्रपटाच्या एडिटिंगदरम्यान महेश भट यांनी त्यांचे अनेक सीन्स कट केले होते आणि त्या काहीच बोलू शकल्या नव्हत्या. 

सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीत महेश यांनी सांगितले होते की, त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात सोनी यांनी त्यांची मदत केली होती. ते म्हणाले होते की, माझी अवस्था वाईट होती. त्यावेळी सोनीने माझी काळजी घेतली.

दुसर्‍या एका मुलाखतीत महेश भट्ट यांनी असेही सांगितले होते की, जेव्हा सोनी त्यांच्या जवळ येत होती तेव्हा त्यांनी तिच्यापासून दूर राहण्याचा खूप प्रयत्न केला कारण त्यावेळी त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या येत होत्या. महेश भट यांनी सोनी राजदान यांना त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता, नाहीतर उध्वस्त होशील असे देखील सांगितले होते पण सोनीने तसे केले नाही. महेश भटसोबत यांच्यासोबत लग्न करण्यासाठी त्यांनी आपलं करिअर पण धोक्यात घातलं होतं. 

टॅग्स :महेश भटआलिया भट