Join us

"अमिताभजी जया बच्चन यांना चांगल्या डॉक्टरांकडे न्या", सोनू निगमचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 15:20 IST

अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन सध्या चर्चेत आल्या आहेत.

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमध्ये २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या दिवशी रात्रीच्या वेळी मोठ्या चेंगराचेंगरीत ३० लोकांचा (Prayagraj Mahakumbh Stampede) मृत्यू झाल्याचे सरकारी अहवालात म्हटले आहे. मात्र, या मृतांची संख्या अधिक असू शकते, असा दावा वेगवेगळ्या स्रोतांकडून केला जात आहे. या घटनेवर अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन यांनी वादग्रस्त विधान केलं. "महाकुंभमध्ये चेंगराचेंगरील मरण पावलेल्यांचे मृतदेह नदीत फेकून दिल्यामुळे प्रयागराजच्या नदीच पाणी प्रदूषित झालं आहे" असा दावा जया बच्चन यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याचा सोनू निगम यानं समाचार घेतला आहे. 

सोनू निगमने सोशल मीडियावर जया बच्चन यांचा व्हिडीओ शेअर करत टीका केली आहे. जया बच्चन यांना डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा सल्ला सोनू निगमनं जया यांचे पती अमिताभ बच्चन यांना दिला आहे. सोून निगमनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, "जया बच्चनजींनी मानसिक संतुलन गमावलं आहे. अमिताभजी, त्यांना चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा". सोनूला पाठिंबा देत अनेक नेटकऱ्यांनी जया यांच्यावर निशाणा साधला आहे.  जया बच्चन यांच्या महाकुंभमेळ्यावरील वादग्रस्त विधानावर आक्षेप घेणारा बॉलिवूड गायक सोनू निगम नाही. तर बिहारचा सोनू निगम सिंग आहे. जो पेशाने वकिल आहे. 

काय म्हणाल्या होत्या जया बच्चन?

संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना सपा खासदार जया बच्चन म्हणाल्या की, "सध्या सर्वात दूषित पाणी कुठे आहे? कुंभ मध्ये... त्या ठिकाणी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह नदीत फेकून दिल्याने पाणी दूषित झाले आहे. खऱ्या मुद्द्यांवर कोणीच बोलत नाहीये. त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही. कुंभमेळ्यात येणाऱ्या सर्वसामान्यांना विशेष सुविधा दिल्या जात नाहीत, त्यांच्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. कोट्यवधी लोक तिथे आले आहेत, असे खोटे बोलले जात आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकाच ठिकाणी कसे जमू शकतात?".

 महाकुंभमेळा १३ जानेवारी रोजी सुरू झाला आणि २६ फेब्रुवारी रोजी संपेल. तर गेल्या २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र संगम नदीत स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक पोहोचले होते. ज्यामध्ये चेंगराचेंगरीमुळे ३० लोकांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान,  चेंगराचेंगरी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी एका महिन्यात पूर्ण करावी, असे आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिले आहेत

टॅग्स :जया बच्चनअमिताभ बच्चनसेलिब्रिटी