Join us

सोनू निगमचे वादग्रस्त tweets; नेटिझन्सचा संताप!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2017 6:57 AM

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम याने स्वत:हून एक वाद ओढवून घेतला आहे.  एकापाठोपाठ केलेल्या ट्विटने सोनू चांगलाच अडचणीत सापडला ...

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम याने स्वत:हून एक वाद ओढवून घेतला आहे.  एकापाठोपाठ केलेल्या ट्विटने सोनू चांगलाच अडचणीत सापडला आहे.  ‘देव सर्वांचं भलं करो. मी मुस्लिम नसूनही सकाळी अजानच्या आवाजानेच मला जाग येते. भारतात बळजबरीने चालणा-या या धार्मिक रुढी कधी थांबणार?  असे ट्विट  त्याने केले . त्याच्या या ट्विटवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर नेटिझन्सनी सोनूला चांगलेच धारेवर धरले. ‘मी तुझा चाहता आहे. पण, तुझे हे अजान बद्दलचे विधान खरंच वेंधळेपणा आहे. तुम्ही इतर धर्मांचा आणि रुढींचाही आदर केला पाहिजे. कारण भारत एक लोकशाही राष्ट्र आहे,अशा शब्दांत एका चाहत्याने सोनूला फटकारले . तर अन्य एकाने ‘विविध धार्मिक रुढींना समजून त्यांचा आदर करायला शिक’, असा सल्ला सोनूला दिला.  काही नेटिझन्सनी तर तीव्र शब्दांत सोनूचा समाचार घेतला. ‘तुझ्यावर कोणी जबरदस्ती केलेली नाही. कानात कापसाचा बोळा टाक अन् शांतपणे झोप’ असे एकाने सोनूला सुनावले. विशेष म्हणजे, सोनूवर नेटिझन्सच्या या ट्विटचा काहीही परिणाम झाला नाही. त्याने उलट एक ट्विट  करून, नेटिझन्सच्या संतापाला वाट करून दिली. ‘मोहम्मद पैंगबर यांनी इस्लामची स्थापना केली होती, तेव्हा विजेची सोय नव्हती. तर मग, एडिसनच्या संशोधनानंतर असले चोचले कशाला ?’ असा सवाल सोनूने उपस्थित केला. इतकेच नाही तर हा सगळा प्रकार गुंडगिरी असल्याचे तो म्हणाला.  कोणत्या मंदिरात किंवा गुरुद्वारामध्येही त्या धर्माचे पालन न करणा-या लोकांना उठवण्यासाठी अशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटीचा वापर केला जात असेल, तर त्यावरही माझा विश्वास नाही, असे मत त्यांने मांडले. तूर्तास सोनूच्या या ट्विटचा सध्या सर्व स्तरांतून निषेध होत आहे.