कोविड काळात अनेकांसाठी देवदूत ठरलेला अभिनेता म्हणजे सोनू सूद (sonu sood). गेल्या काही वर्षापासून सोनू सूद सातत्याने गरजूंची मदत करत आहे. त्यामुळे आज तो अनेकांसाठी सुपरहिरो झाला आहे. पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू खऱ्या आयुष्यात अनेकांसाठी हिरो झाला. विशेष म्हणजे सातत्याने तो करत असलेल्या समाजकार्यामुळे आज तो अनेकांचा आदर्श झाला आहे. सोनूने काही वर्षांपूर्वी सुरु केलेलं हे समाजकार्य आजही सुरु आहे. यामध्येच आता त्याने वृद्ध नागरिकांसाठी एक पाऊल उचललं आहे.
सध्या सोशल मीडियावर सोनू सूदच्या एका स्तुत्य उपक्रमाची चर्चा रंगली आहे. सोनू सूदने त्याच्या द सूद फाऊंडेशनच्या माध्यमातून एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. सोनू लवकरच त्याच्या आईच्या नावाने सरोज सूद या नावाने एक वृद्धाश्रम सुरु करणार आहे. सध्या तरी हे वृद्धाश्रम नेमकं कुठे असेल किंवा त्याविषयी आणखी माहिती समोर आलेली नाही. मात्र, लवकरच तो या कामाकडे वळणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, सोनू सूदने या वृद्धाश्रमाची घोषणा केल्यानंतर चाहत्यांमध्ये या एकाच गोष्टीची चर्चा रंगली आहे. सोनू समाजकार्य करण्यासोबतच कलाविश्वातही सक्रीय आहे. लवकरच त्याचा फतेह हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तो दिग्दर्शन आणि निर्मिती या दोन्ही क्षेत्रात पहिल्यांदाच पदार्पण करत आहे.