अभिनेता सोनू सूद अॅक्शन हिरो म्हणून लोकप्रिय नाही. मात्र तो त्याच्या सिनेमांमध्ये अॅक्शन करताना दिसला आहे. सोनू सूदला मार्शल आर्ट्सचे वेड आहे, हे फार कमी लोकांना माहित आहे. त्याने काही वर्षांपूर्वी आपल्या एका चित्रपटात जॅकी चॅनला घेतले होते. तेव्हा ही बाब उघडकीस आली होती. सोनूला तायक्वांदोमध्ये विशेष रस असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सोनूला तायक्वांदोमधील डॉक्टरेटने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
सोनू सूदला शरीरयष्टीसाठी तायक्वांदोचा विशेष फायदा झाला आहे. तायक्वांदोमधील आपले प्रशिक्षण आणि सातत्याचा सराव, याबरोबरच तायक्वांदोच्या प्रचारासाठी घेतलेल्या पुढाकारासाठी त्याला या डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. त्याला ही डॉक्टरेट देण्याच्या समारंभाला तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव प्रभात शर्मा हे देखील उपस्थित होते.
यावेळी सोनूने तायक्वांदोच्या आपल्या प्राथमिक काळातील आठवणींना उजाळा दिला. लहानपणी आईने जेव्हा पहिल्यांदा तायक्वांदोचा ड्रेस आणला होता, तेव्हाची आपल्याला आठवण झाल्याचे त्याने सांगितले. तायक्वांदोमधील डॉक्टरेट स्वीकारताना आपल्या आईला अधिक आनंद झाला असता असे सांगून त्याने आईचेही स्मरण केले. तायक्वांदोचा प्रसार अधिक करण्यासाठी प्रोत्साहन म्हणूनच ही डॉक्टरेट मिळाली आहे. यामुळे आपल्यावरील जबाबदारी अधिकच वाढली आहे. आता अजून खूप मोठा पल्ला पार करायचा आहे. ही तर एक सुरुवात झाली आहे, असेही तो म्हणाला. सोनू रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंबा चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यात तो रणवीर सिंग व सारा अली खान सोबत दिसणार आहे. या चित्रपटात तो दमदार अॅक्शन सीन करताना दिसणार आहे. इतकेच नाही तर या सिनेमात सोनू मराठी डायलॉग बोलताना दिसणार असून यासाठी त्याने मराठी भाषेचे धडे गिरवले आहेत. तो पहिल्यांदाच मराठीत बोलताना दिसणार आहे.